bornhan-764x430
नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे संक्रांत. यावर्षी 15 जानेवारीला मकर संक्रांत (Makar Sankranti 2023) आहे. तिळगूळ वाटून एकमेकांना शुभेच्छा देणे, पतंग उडवणे, हळदी कुंकू अशा सगळ्या गोष्टींची रेलचेल यादिवशी असतो. याशिवाय आणखी एका कार्यक्रमाची उत्सुकता असते तो म्हणजे बोरन्हाण. संक्रांतीनिमित्त लहान मुलांचे बोरन्हाण (Bornhan) केले जाते. हे बोरन्हाण करण्यामागचं कारण आणि ते करण्याची पद्धत (Bornhan Method) आपण जाणून घेऊयात.
बोरन्हाण करण्याचं कारण
बोरन्हाण का करायचे यासंदर्भात एक आख्यायिका आहे. करी नावाचा एक राक्षस होता. त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नये त्यासाठी सर्वात आधी बोरन्हाण कृष्णावर केले गेले, त्यानंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासून लहान मुलांचे बोरन्हाण केले जाते.
[read_also content=”‘या’ दिवशी साजरा करा मकर संक्रांतीचा सण, मुहूर्त, कथा आणि दानाचे महत्त्व जाणून घ्या https://www.navarashtra.com/lifestyle/makar-sankranti-2023-day-and-muhurt-of-makar-sankranti-nrsr-361055.html”]
बोरन्हाण करण्यामागे शास्त्र आहे की, या कालावधीत वातावरणात अनेक बदल होत असतात. लहान मुलांना या बदलत्या ऋतुची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळं उदारणार्थ बोर, उसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा लहान मुलांच्या डोक्यावरुन टाकल्या जातात. लहान मुलं इतरवेळी ती फळं दिली तर खात नाहीत. पण अशा खेळाच्या माध्यमातून ती वेचून खायला त्यांना आवडू शकते. त्यामुळे पुढील वातावरणासाठी त्यांचे शरीर सुदृढ बनते असे शास्त्रीय कारण आहे.
बोरन्हाण पद्धत
साधारण १ ते ५ वर्षांच्या मुलांचे बोरन्हाण केले जाते. हा लहान मुलांचा कौतुक सोहळा असतो. यासाठी हलव्याचे दागिने घालून लहान मुलांना छान तयार केले जाते. पाटावर बसवून त्यांचे औक्षण केले जाते. बोरं, ऊस, हरभरे, मुरमुरे, बत्तासे, हलवा, तिळाच्या रेवड्या, बिस्कीट, गोळ्या असे सर्व पदार्थ एकत्र करून बाळाच्या डोक्यावरुन ते टाकले जातात. बाळाला या पदार्थांनी अंघोळ घातली जाते. त्यानंतर कार्यक्रमासाठी आलेल्या लहान मुलांना ती बोरं, उसाचे तुकडे, शेंगा उचलून खाऊ द्यावेत किंवा घरी घेऊन जाण्यासाठी सांगावेत. बोरन्हाणमध्ये वापरण्यात येणारी फळं मुले इतर वेळी खात नाहीत म्हणून बोरन्हाणच्या माध्यमातून ती लहान मुलांच्या पोटात जावीत हा त्यामागचा हेतू असतो.
याला काही भागात बोरलुट असेही नाव आहे. यामध्ये बाळाच्या कौतुकाचा भाग तर आहेच मात्र पालकांची हौसही आहे. त्या त्या ऋतुत येणारी फळे खाण्याची सवय बाळांना लावण्याचा हा अनोखा प्रयत्न आहे. बाळावर सगळ्यांच्या प्रेमाचा वर्षाव होऊ दे. बाळ सुबत्तेत न्हाउ दे, असा यामागचा उद्देश असतो.