
पुरुषांनो सावधान! वंध्यत्वाची ही लक्षणे दिसताच चुकूनही करू नका दुर्लक्ष, अन्यथा वाढेल Infertility चा धोका
जगभरात पुरुषांमधील वाढत्या वंध्यत्वाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. वंध्यत्वाच्या एकूण केसेसपैकी ५० टक्के केसेस पुरुषांमधील आरोग्याच्या समस्या कारणीभूत असल्याचे निदर्शनास आले आहे. ही टक्केवारी पाहता आपल्यालाही अशी काही छुपी समस्या तर नाही ना, अशी धास्ती अनेक पुरुषांना वाटणे साहजिक आहे. परंतु, आता या विषयावर जास्त भीती बाळगण्याची गरज नाही. योग्य वेळी लक्षणे ओळखून उपचार घेतल्यास या समस्येवर मात करता येते. पुरुषांनी आपल्या प्रजनन क्षमतेशी संबंधित सर्व बाबींसंदर्भात नेहमीच सतर्क राहिले पाहिजे. प्रत्येक पुरुषाला वंध्यत्वासंबंधीची महत्त्वाची लक्षणे माहिती असायला हवीत. याबद्दल डॉ. निलेश उन्मेश बलकवडे, प्रादेशिक वैद्यकीय प्रमुख – वाकड, ओएसिस फर्टिलिटी यांनी सविस्तर माहिती दिली आहे.(फोटो सौजन्य – istock)
Diabetes Tips : मधुमेहींसाठी सूर्यनमस्कार ठरू शकतो वरदान! जाणून घ्या योग्य वेळ, पद्धत आणि फायदे
लिंग ताठरता, वीर्यपतन किंवा लैंगिक क्षमतेशी संबंधित समस्या या शरीरातील अंतर्गत आजारांचे संकेत देतात. या सर्व प्रक्रिया शरीरातील रक्तप्रवाह, मज्जासंस्थेचे कार्य आणि हार्मोन्सच्या पातळीवर अवलंबून असतात. यात ‘टेस्टोस्टेरॉन’ हार्मोन महत्त्वाची भूमिका बजावते. शरीराच्या या यंत्रणेत बिघाड झाल्यास लैंगिक आरोग्यांच्या समस्यांना सामोरे जावे लागते. शुक्राणूंची निर्मिती तसेच त्याच्या वहन कार्यातही अडथळा निर्माण होतो. त्यामुळे प्रजननक्षमता कमी होऊ शकते. परिणामी, नैसर्गिकरित्या गर्भधारणा होण्यास अडचणी निर्माण होतात. अशा लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच वैद्यकीय सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.
‘टेस्टोस्टेरॉन’ हार्मोन्सचे प्रमाण घटल्यास लैंगिक इच्छा फारशी जाणवत नाही. पुरुषांच्या शरीरात शुक्राणूंची निर्मिती होण्यासाठी टेस्टोस्टेरॉन महत्त्वाचे असते. या हार्मोन्सची पातळी खालावल्यास शुक्राणूंची संख्या घटू शकते किंवा त्यांची गुणवत्ता कमी होऊ शकते. याचा थेट परिणाम प्रजननक्षमतेवर होतो. अनेकदा लैंगिक इच्छा कमी होणे हे शरीराच्या हार्मोन्समध्ये बदल झाल्याचे प्राथमिक लक्षण मानले जाते.
पुरुषांच्य अंडकोषात शुक्राणूंची निर्मिती होते. या भागात सूज किंवा वेदना जाणवल्यास दुर्लक्ष करू नका. अंडकोषाच्या शिरा फुगणे, संसर्ग किंवा रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यास या भागावरील ताण वाढतो. या समस्यांमुळे अंडकोषाचे तापमान वाढते किंवा रक्तपुरवठ्यावर थेट परिणाम होण्याची भीती असते. या दोन्ही गोष्टी शुक्राणूंच्या निर्मितीसाठी आणि त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. परिणामी, शुक्राणूंची संख्या, गुणवत्ता आणि कार्यक्षमता घटण्याची शक्यता असते. अंडकोषात सतत सूज किंवा वेदना निर्माण झाल्यास शुक्राणूंच्या निर्मितीवर विपरित परिणाम होतो.
पुरुषांच्या शरीरातील वीर्य हे शुक्राणूंचे वहन करते. शुक्राणूंचे संरक्षण करण्यातही त्यांची महत्त्वाची भूमिका असते. वीर्याचे प्रमाण कमी असणे, त्याची घनता कमी-जास्त असणे किंवा वीर्यपतनाच्या वेळी वीर्य बाहेर न बडणे यांसारखे बदल प्रजनन आरोग्याशी संबंधित समस्यांची लक्षणे मानली जातात. या समस्या प्रोस्टेट ग्रंथी, वीर्यपुटिका किंवा शुक्रवाहिन्यांमधील अडथळे निर्माण करू शकतात. या बदलांमुळे शुक्राणूंचे योग्यरित्या वहन होत नाही. या बदलांमुळे स्त्रीच्या अंड्यापर्यंत पोहोचणा-या निरोगी शुक्राणूंच्या संख्येत मोठी घट होते. यामुळे गर्भधारणेच्या समस्या उद्भवतात.
पुरुषांच्या शरीरावरील केसांची वाढ ही प्रामुख्याने टेस्टोस्टेरॉन हार्मोनवर अवलंबून असते. टेस्टोस्टेरॉन असंतुलिक राहिल्यास चेह-यावरील दाढी-मिशी किंवा अंगावर फारसे केस दिसत नाही. हाच हार्मोन शुक्राणूंची निर्मितीवरही नियंत्रण राखतो. त्यामुळे पुरुषांच्या शरीरावरील केसांच्या वाढीतील बदल हे हार्मोन्सच्या कार्यात बिघाड झाल्याचेही संकेत देतात. यामुळे पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता असते.
अंडकोषाच्या आकारावर शुक्राणूंची निर्मिती क्षमता अवलंबून असते. अंडकोषाचा आकार लहान असणे किंवा ते असामान्य स्वरुपात कडक असणे हे कमी शुक्राणूनिर्मितीचे लक्षण असू शकते. शरीरातील बदल किंवा हार्मोनससंबंधित समस्यांमुळे हे घडते. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, शुक्राणूंची निर्मिती होणा-या मूळ रचनेलाच इजा किंवा बाधा पोहोचल्यास शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता खालावते.
हार्मोन्सचे असंतुलन तसेच टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण कमी असल्यास थकवा जाणवतो, वजन वाढते, दैनंदिन कामासाठीही शरीरात पुरेशी ऊर्जा नसते. हे बदल शरीरातील अंतर्गत ग्रंथींच्या संतुलनात अडथळा आणतात. याचा थेट परिणाम शुक्राणूंच्या निर्मितीवर होतो. या समस्या सुरुवातीला जाणवत नाही. हळूहळू शुक्राणूंची संख्या, गुणवत्ता आणि कार्यक्षमता कमी होते. अशी लक्षणे आढळल्यास दुर्लक्ष करु नका. तातडीने वैद्यकीय सल्ला घ्या.
पूर्व आयुष्यातील घडामोडी तसेच दैनंदिन सवयींचा प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. भूतकाळातील शस्त्रक्रिया, संसर्ग आणि दीर्घकालीन आजार यामुळे शुक्राणूंच्या निर्मितीमध्ये अडथळे निर्माण होतात. धूम्रपान करणे, मद्यपानाचे अतिसेवन, हानिकारक रसायनांशी संपर्क आल्यास आरोग्य बिघडते. चुकीचा आहार आणि मानसिक ताण या चुकीच्या जीवनशैलीमुळेही प्रजनन क्षमता घटते. या सर्व गोष्टींमुळे पुरुषांमधील शुक्राणूंचे आरोग्य हळूहळू खालावत जाते.
वर्षभर कोणतेही गर्भनिरोधक साधन न वापरता नियमित शारीरिक संबंध ठेवल्यानंतरही गर्भधारणा होत नसल्सास वंधत्वाचे निदान होते. गर्भधारणा न होण्यामागे पुरुषांच्या शुक्राणूंशी संबंधित समस्या असू शकतात. शुक्राणूंची संख्या कमी होणे, त्यांची हालचाल योग्य प्रकारे न होणे किंवा त्यांचा आकार असामान्य असणे ही त्यामागील प्रमुख कारणे आहेत. गर्भधारणेसाठी या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात. हे बदल सूक्ष्म पातळीवर होत असल्याने सहसा लक्षात येत नाहीत. इतर समस्याही जाणवत नाही. आपले शरीर निरोगी असल्याचे भासत असले तरीही प्रत्यक्षात प्रजनन क्षमतेत बिघाड होत असतो.वैद्यकीय मार्गदर्शक तत्वांनुसार, ठराविक कालावधीनंतर गर्भधारणा होत नसल्यास प्रजनन क्षमतेशी संबंधित चाचणी करुन घ्यावी.
पुरुषांची प्रजनन क्षमता मुळात फार सक्षम आणि गतिशील असते. पुरुषांच्या अंडकोषांमध्ये दर ७० ते ९० दिवसांनी नवीन शुक्राणूंची निर्मिती होत असते. महिलांच्या तुलनेत पुरुषांचे शरीर नव्याने आपली प्रजनन क्षमता तयार करत असते. त्यामुळे जीवनशैलीसह आहारातील सकारात्मक बदलांना पुरुषांचे शरीर तातडीने सकारात्मक प्रतिसाद देते.
जीवनशैलीत सुधारणा केल्यास, हार्मोन्सचे संतुलन राखल्यास किंवा आरोग्याच्या समस्यांवर योग्य उपचार घेतल्यास शुक्राणूंच्या आरोग्यात सुधारणा घडून येते. या समस्यांचे वेळीच निदान झाल्यास उपचारांची परिणामकारता चांगली दिसून येते. पुरुषांची प्रजनन रचना सकारात्मक बदलांना योग्य प्रतिसाद देते. त्यामुळे वेळेवर तपासणी, योग्य उपचार आणि निरोगी जीवनशैली आत्मसात केल्यास प्रजजन क्षमता सुधारते. जागरुकता बाळगत योग्य काळजी घेतल्यास अनेक पुरुषांना वंध्यत्वाच्या समस्यांवर मात करता येते.
सुखी जीवनाचे रहस्य! ‘या’ सकारात्मक विचारांनी बदलून जाईल आयुष्याचा दृष्टिकोन, राहाल कायमच आनंदी
योग्य उपचारांच्या मदतीने वंध्यत्वावर मात करता येते. याकरिता वेळेवर निदान होणे गरजेचे असते. तातडीने वंध्यत्व तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास नैसर्गिकरित्या गर्भधारणा होण्यची शक्यता वाढते. वेळेवर उपचार सुरु केल्यास डॉक्टरांनाही सर्व प्रक्रिया पार पाडणे सोपे होते. वंध्यत्वाच्या उपचारांसाठी कोणताही संकोच बाळगू नका.
Ans: पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या, हालचाल किंवा गुणवत्ता कमी असणे किंवा प्रजननाशी संबंधित समस्या असणे याला पुरुष वंध्यत्व म्हणतात.
Ans: काही वेळा लैंगिक आरोग्यातील बदल, शुक्राणूंची समस्या, हार्मोनल बदल, अंडकोषाशी संबंधित त्रास किंवा इतर शारीरिक संकेत दिसू शकतात. अचूक निदानासाठी वैद्यकीय तपासणी आवश्यक असते.
Ans: होय, असंतुलित आहार, ताण, कमी झोप, धूम्रपान, मद्यपान आणि शारीरिक निष्क्रियता यांचा परिणाम आरोग्यावर होऊ शकतो.