Chicken Pakoda Recipe : तुम्हीही संडे स्पेशल घरी नाॅनव्हेजचा प्लॅन आखला आहे? मग स्टाटर्ससाठी चिकन पकोडा एकदा नक्की बनवून खा. याची रेसिपी आहे फार सोपी आणि झटपट.
चिकनपासून लव्हर्ससाठी चिकन पकोडा हा एक चविष्ट आणि झटपट तयार होणारा पर्याय आहे. पुदिन्याची चटणी आणि शेझवान चटणीसोबत याची चव आणखीनच अप्रतिम लागते. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ, रसाळ चिकन असा याचा पोत असतो. विकेंड स्पेशल घरी चिकनचा बेत असल्यास तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता. संध्याकाळच्या चहासोबत, विकेंडला घरच्या घरी छोटासा स्नॅक तयार करताना किंवा पाहुणे घरी आले असता हा पदार्थ करता येतो. मुख्य म्हणजे याची कुरकुरीत आणि मसालेदार चव लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी ठरते. चला तर मग याची रेसिपीनोट करून घेऊयात.
बोनलेस चिकन स्वच्छ धुऊन त्यातील अतिरिक्त पाणी काढून घ्या. चिकनचे मध्यम आकाराचे छोटे तुकडे करा. तुकडे फार मोठे ठेवू नका, त्यामुळे ते व्यवस्थित शिजण्यास मदत होते.
एका भांड्यात चिकनचे तुकडे घेऊन त्यात आले-लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, गरम मसाला, जिरेपूड, धणेपूड, लिंबाचा रस आणि मीठ घाला. हे सर्व साहित्य चिकनला चांगले लागेल अशा पद्धतीने मिसळा. साधारण 20 ते 30 मिनिटे चिकन मॅरिनेट होऊ द्या.
मॅरिनेट केलेल्या चिकनमध्ये बेसन, तांदळाचे पीठ आणि कॉर्नफ्लोअर घाला. त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कोथिंबीर घाला. आवश्यकतेनुसार थोडे पाणी घालून घट्टसर मिश्रण तयार करा. मिश्रण खूप पातळ ठेवू नका, अन्यथा पकोडे तेलात पसरू शकतात.
कढईत पकोडे तळण्यासाठी पुरेसे तेल घ्या आणि मध्यम आचेवर गरम करा. तेल पुरेसे गरम झाले आहे की नाही हे पाहण्यासाठी थोडे मिश्रण तेलात सोडा. ते हळूहळू वर येत असेल तर तेल तळण्यासाठी योग्य तापमानाला आले आहे.
तयार मिश्रणातील चिकनचे तुकडे एकेक करून गरम तेलात सोडा. कढईमध्ये एकावेळी खूप जास्त पकोडे टाकू नका. मध्यम आचेवर चिकनचे तुकडे बाहेरून सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.
पकोडे व्यवस्थित तळले की ते झाऱ्याच्या मदतीने बाहेर काढा. अतिरिक्त तेल निघून जाण्यासाठी त्यांना टिश्यू
पेपरवर किंवा जाळीदार प्लेटमध्ये ठेवा. यामुळे पकोडे जास्त तेलकट होणार नाहीत.