
हवेची गुणवत्ता घसरल्याने फुप्फुसाची पुरती दमछाक! फटाक्यांमुळे भाजलेल्या रुग्णांसह दमा-अस्थम्याच्या रुग्णांचीही डॉक्टरांकडे धाव
Health Update: दिवाळीच्या काळात फटाक्यांच्या आतषबाजीचा परिणाम केवळ ध्वनिप्रदूषणापुरता मर्यादित राहिला नाही, तर मुंबईसह राज्यातील अनेक शहरांमधील हवेची गुणवत्ता खालावल्याचे चित्र दिसून आले. वाहनांचा धूर, बांधकामांमधील धूळ आणि फटाक्यांमधून बाहेर पडणारे सूक्ष्म प्रदूषक कण यामुळे श्वसनासाठी पोषक नसलेली हवा निर्माण झाली. याचा परिणाम श्वसनविकार असलेल्या नागरिकांवर जाणवला. सार्वजनिक रुग्णालयांमध्ये फटाक्यांमुळे भाजलेल्या रुग्णांवर उपचार सुरू असतानाच, खासगी डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये दमा आणि अस्थमाच्या रुग्णांनीही धाव घेतल्याचे डॉक्टरांनी सांगितले. प्रदूषणामुळे अॅलर्जी, खोकला, श्वास घेण्यास त्रास आणि दम्याचा त्रास वाढल्याच्या तक्रारी रुग्णांकडून करण्यात आल्या.(फोटो सौजन्य – AI)
दिवाळीनंतर हवेतील प्रदूषणाचा परिणाम मुंबईतही जाणवला. ९ नोव्हेंबरला मुंबईचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक १७२ वर पोहोचला होता. शहरातील आठ निरीक्षण केंद्रांवर हवेची गुणवत्ता खराब श्रेणीत नोंदवण्यात आली. वांद्रे पूर्व येथे एक्यूआय २६५, बीकेसी २३२, शिवडी २२९, देवनार २२८, घाटकोपर २२१ आणि चेंबूरमध्ये २१५ इतका निर्देशांक होता.
मुंबईपेक्षाही राज्यातील अंतर्गत शहरांमध्ये प्रदूषणाची तीव्रता अधिक होती. पिंपरी-चिंचवडमध्ये एक्यूआय ३०१, नांदेड २९६, पुणे २८८, मालेगाव २७३, नागपूर २६८, जळगाव २४३ आणि नाशिकमध्ये २३४ इतकी नोंद झाली. राज्यातील १३ शहरांमधील हवा खराब किंवा अतिखराब श्रेणीत पोहोचली होती.
खासगी क्लिनिकमधील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, या काळात दमा आणि अस्थमाचा त्रास असलेल्या रुग्णांच्या तक्रारी वाढल्या. काही रुग्णांना श्वास घेण्यास त्रास, सतत खोकला, घशात खवखव आणि अॅलर्जीची लक्षणे जाणवत होती. आधीपासून श्वसनविकार असलेल्या रुग्णांना प्रदूषित हवेमुळे अधिक त्रास सहन करावा लागला. सार्वजनिक रुग्णालयांमध्ये फटाक्यांमुळे भाजलेल्या रुग्णांवर उपचार सुरू असतानाच खासगी डॉक्टरांकडे श्वसनाच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांचीही वर्दळ होती.
यावर बोलताना मुंबई महानगर पालिकेच्या निवृत्त कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी सांगितले की, वाहनांचा धूर, बांधकामांमधील धूळ, औद्योगिक उत्सर्जन आणि हवेतील सूक्ष्म प्रदूषक कण फुप्फुसांच्या आतील भागापर्यंत पोहोचून सूज निर्माण करू शकतात. त्यामुळे दम्याचा त्रास वाढणे, सीओपीडी रुग्णांची प्रकृती बिघडणे आणि फुप्फुसांची कार्यक्षमता कमी होण्याचा धोका असतो. दीर्घकाळ प्रदूषित हवेत राहिल्याने फुप्फुसांच्या कर्करोगाचाही धोका वाढू शकतो. त्यामुळे बांधकामांतील धूळ नियंत्रण, वाहनांचे उत्सर्जन कमी करणे आणि स्वच्छ हवा राखणे आवश्यक आहे.
Diabetes: गोड खात नाही, तरीही शुगर लेव्हल वाढतेय? डायबिटीज कंट्रोलसाठी रोजच्या ‘या’ चुका टाळा
फटाक्यांचा धूर आणि त्यातून बाहेर पडणारे सूक्ष्म प्रदूषक कण यांचा परिणाम केवळ फुप्फुसांवरच नव्हे, तर डोळे, त्वचा, कान आणि नाकावरही होतो. प्रदूषित हवेमुळे डोळ्यांची जळजळ, लालसरपणा, पाणी येणे, त्वचेवर खाज आणि पुरळ येणे, तसेच नाकातून पाणी येणे, शिंका आणि घशात खवखव अशा तक्रारी उद्भवू शकतात. आधीपासून अॅलर्जी असलेल्या व्यक्तीमध्ये या तक्रारी अधिक तीव्र होऊ शकतात. फटाक्यांच्या मोठ्या आवाजामुळे ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि अॅलर्जीग्रस्तांनी काळजी घेणे आवश्यक असल्याचे पालिकेच्या अगरवाल रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजूसिंग राठोड यांनी सांगितले.
Ans: हवेतील धूळ, धूर आणि सूक्ष्म प्रदूषक कण श्वसनमार्गात प्रवेश करतात. यामुळे खोकला, घसा खवखवणे, श्वास घेण्यास त्रास होणे आणि फुफ्फुसांशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.
Ans: होय. हवेतील प्रदूषक घटकांमुळे श्वसनमार्गाला सूज येऊ शकते. त्यामुळे दमा आणि अस्थम्याच्या रुग्णांमध्ये खोकला, घरघर आणि श्वास घेण्यास त्रास होण्याची शक्यता वाढते.
Ans: फटाक्यांच्या धुरामुळे डोळ्यांची जळजळ, घशात खवखव, खोकला आणि श्वसनाचा त्रास होऊ शकतो. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनविकार असलेल्या व्यक्तींना याचा अधिक त्रास होऊ शकतो.