फोटो सौजन्य - Social Media
कोकण सुंदर आहे तितका भयाणही! फक्त दिवसा रात्रीचा फरक आहे. दिवसा नक्षत्रांचा सुखद अनुभव देणारा कोकण रात्री साऱ्यांचे नक्षत्रंच फिरवून टाकतो. पण कधी कधी अशा गोष्टी घडण्यासाठी रात्रीच्या अंधाराची गरज भासत नाही. कोकण हा तेथील राखनदारांसाठी विशेष ओळखला जातो. येथील राखणदार नावाप्रमाणे त्या-त्या जागेचे राखण करतात. त्यांना दरवर्षी मानही द्यावा लागतो. मान कमी पडला तर मान कापली जाण्यास फार वेळ लागत नाही. अशीच भर दुपारी एक चित्र विचित्र घटना, कोकणातल्या दापोली तालुक्यात घडली होती. घटना फार भयाण नव्हती पण विचारात पाडणारी होती.
दीप आणि मितेश दोघे चुलत भाऊ! लहान काकाच्या लग्नासाठी हे मुंबईचे मुष्टन्डे गावाकडे आले होते. हळदीचा दिवस होता. कोकणातील हळद म्हणजे धुरळाच! चिकन-मटणाची रास लागली होती तर रात्रीसाठी घरा मागच्या मैदानात पिण्याची सोय सुरु होती. दुपारचे बहुतेक २ वाजले असतील. या दोन बंधूंना काही कामं नसल्याने दोघेही नदीकडे जाण्यासाठी निघतात. घरापासून नदीकडे जाण्याचा रस्ता तसा फार कठीण! आणि फारच दूरचा! गावाबाहेर असलेल्या या नदीकडे जाण्यासाठी संपूर्ण डोगर उतरावे लागते. चार-पाच शेतांचे मोठे मैदान पार केल्यावर वाट नदीकडे येऊन ठेपते. हा संपूर्ण प्रवास करत, दीप आणि मितेश नदीच्या काठी येऊन पोहचतात. त्याचक्षणी, काठी टेकत अंगावर एक घोंगडी घेतलेला म्हातारा काठीचा घुंगुर वाजवत त्यांच्याकडे येतो.
चेहऱ्यावर एक आकर्षक तेज असलेले हसू घेत तो म्हातारा त्या दोघांना विचारतो,”बावांनो, कोण रं तुमी? अन इथं काय करताव?” दीप तेव्हा त्यांना सांगतो की,”बाबा, आम्ही खोतांच्या घरातले आहोत. माझ्या काकाची हळद आहे.” तेव्हा तो म्हातारा त्यांना विचारतो,” म्हणजे तू रामखोताचा नातू का?” तेव्हा दीप त्यांना नकार देत त्यांना त्यांच्या आजोबांचं नाव विष्णू असल्याचं सांगतो. बाबा हसत म्हणतात की,” अच्छा, मग आजोबास काय करतो आता?” असा अनेक चर्चा त्यांच्यात चालतात. काही वेळाने त्या म्हाताऱ्याने त्या मुलांना नदीच्या त्या कडेला जाऊ नका असे बजावले आणि पुढे निघून गेला. दीप आणि मितेश विचारात पडले की तिथे इतकी सुंदर जागा आहे आणि हे तिथे जाऊ नका असे अचानक का म्हणाले? दीप याचे कारण विचारण्यासाठी मागे वळला आणि पाहतो तर काय “दूरदूरपर्यंत तो म्हातारा नजरेस येत नाही.”
आधी अतिशय धीम्या गतीने काठी टेकत-टेकत येणारा वयोवृद्ध अचानक जलद गतीने इतका मोठा मैदान कसा पार करू शकतो? असे अनेक प्रश्न त्या दोघांच्या मनी आले. पण खरं म्हणजे तो वयोवृद्ध दुसरा तिसरा कुणी नसून त्या ठिकाणचा राखणदार होता. ज्या ठिकाणी त्यांनी त्या मुलांना जाण्यास रोखले, त्या ठिकाणी अनेक जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. कदाचित त्या मुलांना राखणदाराने येऊन समज देऊन दुर्घटनेपासून वाचवले.
(टीपः आम्ही देत असणारे हे आर्टिकल काही व्यक्तींसह घडलेले अनुभव आहेत. मात्र आम्ही कोणतीही अंधश्रद्धा पसरवत नाही तर हे आर्टिकल केवळ माहिती आणि मनोरंजनाकरिता असून Navarashtra.com यासाठी कोणतीही पुष्टी देत नाही)