देशभरात १७ एप्रिलला राम नवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. संपूर्ण देशाला यंदाच्या राम नवमीची उत्सुकता लागली आहे. तसेच अयोध्येत राम मंदिर तयार झाल्यानंतर पहिल्यांदाच राम नवमी साजरा केली जाणार आहे. पहिल्याच जन्मोत्सव सोहळ्याला लाखोच्या संख्येने भाविक अयोध्येत दाखल होणार आहे. २२ जानेवारीला अयोध्यातील राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचे लोकार्पण झाले.
राम मंदिराचे लोकार्पण झाल्यानंतर अयोध्येत दररोज लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी जातात. मात्र यंदाच्या राम नवमीला अयोध्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक गर्दी होण्याची शक्यता आहे. अयोध्येत येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी राममंदिर तीर्थक्षेत्राने अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी या सूचनांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.
राम नवमीला अयोध्येमध्ये प्रभू श्री रामाचें दर्शन घेण्यासाठी अधिक वेळ देण्यात आला आहे. अयोध्येमध्ये येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता राम मंदिर ट्रस्ट कडून अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. दर्शनाच्या वेळेमध्ये बदल करण्यात आले आहेत. दर्शनाचा कालावधी वाढवून १९ तास भाविकांना दर्शन घेता येणार आहे. इतर वेळी दर्शनासाठी ४५ मिनिटं ते १ तासांचा वेळ लागतो. मात्र राम नवमीला होणारी गर्दी लक्षात घेता यामध्ये बदल करण्यात आले आहेत. गर्दीमुळे भाविकांना जास्त वेळ रांगेत उभे राहावे लागणार आहे.
राम मंदिरामध्ये दिवसांतून चार वेळा नैवेद्य दाखवला जातो. मंदिरात होणारी आरती आणि नैवेद्यासाठी मंदिर बंद ठेवले जाते. मात्र राम नवमीच्या दिवशी कमी वेळ मंदिर बंद ठेवले जाणार आहे. त्यामुळे भाविकांना फार वेळ रांगेत उभे राहावे लागणार नाही. पहाटे ३. ३० वाजल्यापासून रामनवमीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर दर्शनासाठी रांगांची सोय करण्यात आली आहे. तसेच १५ ते १९ एप्रिल दरम्यान VIP पास, सुगम दर्शन पास आणि मंगला आरती, शृंगार आरती आणि शयन आरती पास असे इतर कोणतेही पास दिले जाणार नाहीत. भाविकांना राम नवमीच्या दिवशी दर्शनासाठी येताना फोन न आणण्याचे आव्हान करण्यात आले आहे. त्यामुळे दर्शन सुलभ होईल. मंदिरामध्ये फोन आणि इतर वस्तू नेण्यासाठी बंदी असेल.
अयोध्येत सध्या ४० पेक्षा जास्त तापमान आहे. त्यामुळे भाविकांनी दर्शनाला येताना उन्हातून संरक्षण होण्यासाठी काळजी घ्यावी,असे आव्हान मंदिर ट्रस्टकडून करण्यात आले आहे. क्तांचे पाय उन्हाने पोळू नयेत म्हणून खास मॅट टाकण्यात आल्या आहेत. दर्शन मार्गावरील प्रवासी सुविधा केंद्रात रामनवमीला होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता रेल्वे आरक्षण केंद्रही उभारण्यात आली आहेत.