
फोटो सौजन्य - Social Media
त्या काळी गावात वीजपुरवठा नियमित नव्हता. अनेक घरांमध्ये दिवा नसल्याने अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शाळेने एक वेगळी सोय केली होती. रात्री अभ्यास करू इच्छिणाऱ्या मुलांसाठी शाळेतील एक वर्ग संपूर्ण रात्र खुला ठेवण्यात येत असे. घर लहान असल्याने आणि घरच्यांना त्रास होऊ नये म्हणून राजवीरसह ३-४ मित्र दररोज रात्री शाळेत जाऊन अभ्यास करत असत. त्या दिवशीही सगळे मित्र जेवण करून रात्री दहाच्या सुमारास शाळेकडे निघाले. सुरुवातीला सगळं अगदी नेहमीसारखंच होतं. अभ्यास चालू होता. मात्र बराच वेळ बसून राजवीरला कंटाळा आला. तो थोडा वेळ शाळेच्या मैदानात फेरफटका मारायला बाहेर आला. तेव्हा त्याची नजर दूरवर असलेल्या किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे गेली.
रात्रीचे साडेबारा वाजले होते. अंधारात किल्ल्याच्या दिशेने पाहताना त्याला लालभडक लुगड्यात एक महिला उभी असल्याचे दिसले. “या वेळी ही बाई इथे काय करत असेल?” असा विचार त्याच्या मनात आला. कदाचित शेजारच्या गावातून चालत येत असेल, असे त्याला वाटले. त्या काळी वाहनांची सोय नव्हती; लोक पायीच प्रवास करत.
थोड्याच वेळात ती महिला हळूहळू गावाच्या दिशेने चालू लागली. राजवीर पुन्हा वर्गात परतला; मात्र बाहेर जाण्याआधी त्याने पुन्हा एकदा तिच्याकडे पाहिले. आता ती शाळेच्या गेटजवळ येऊन थांबली होती… आणि थेट राजवीरकडे पाहत उभी राहिली होती. काही क्षण दोघांचेही डोळे एकमेकांत खिळले. अचानक ती महिला शाळेच्या उजव्या बाजूला वळून नजरेआड झाली.
पंधरा मिनिटांत अभ्यास संपवून सगळे मित्र मागच्या दाराने घराकडे निघाले. राजवीर मात्र सगळं आवरून, दिवे बंद करून पुढच्या दाराने बाहेर पडला, जिथे आधी ती महिला उभी होती. घड्याळात एक वाजला होता. शाळेला डावीकडून वळसा घालत तो घरी जात असतानाच… अचानक ती महिला त्याच्या समोर उभी राहिली. लालभडक वेश, रागीट डोळे आणि मोकळे केस… किल्ल्याकडून येताना तिचे केस बांधलेले होते, हे त्याला स्पष्ट आठवत होते. अंगावर काटा आला; मात्र राजवीर न डगमगता तिच्या बाजूने न बोलता पुढे निघून गेला.
तो मामाकडे राहत होता. दार ठोठावल्यावर मामा दार उघडून त्याला आत घेतले. दार बंद झाले, तरी राजवीरची नजर दाराकडेच खिळलेली होती. “ती माझ्यामागे आली नसेल ना?” या विचाराने त्याचे हात थरथरत होते. दाराच्या एका भेगातून त्याने बाहेर डोकावले… आणि त्याच क्षणी त्याच्या अंगातील त्राण गेले. ती महिला घराबाहेर उभी होती… आणि त्याच भेगातून थेट घरात पाहत होती. भीतीने राजवीर खाली कोसळला. मात्र त्या रात्री त्याने ही घटना कुणालाही सांगितली नाही. आश्चर्य म्हणजे, त्यानंतर त्या गावात किंवा राजवीरच्या आयुष्यात अशी कोणतीही घटना पुन्हा घडली नाही. पण आजही त्या लाल वेशातील स्त्रीचा चेहरा, ते रागीट डोळे आणि दाराच्या भेगेतून केलेली नजर राजवीरच्या आठवणींमध्ये जिवंत आहेत.
टीपः हा लेख केवळ मनोरंजन आणि माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरविण्याचा Navarashtra.com चा हेतू नाही.