फोटो सौजन्य - Social Media
भरत आणि भावेश, साडे बाराचा काटा लागताच, त्यांनी भाड्याने घेतलेल्या Ntorc वर फार्म हाऊसकडे निघाले. भरत आणि भावेशला फार्म हाऊसकडे जाण्याचा रस्ता ठाऊक नव्हता आणि त्यावेळी पत्ता विचारण्यासाठीही आजूबाजूला कुणी दिसत नव्हते. दोघेही रामभरोसे होते. गाडी सुरु केली. अंधाराला सारत गाडी सुसाट जात होती. त्या ठिकाणापासून किमान ४ ते ५ किमी दूर आल्यावर त्यांना दूरवर एक म्हातारी दिसली. ती वृद्ध महिला त्यांच्याकडेच पाहत होती. भरतने बाईक थांबवली नाही. भावेश त्याला म्हणू लागला की समोर भूत आहे पण भरतला या गोष्टींची जाणीव होती. त्याने भावेशला तिच्याकडे न पाहण्याचा सल्ला दिला.
ज्या ठिकाणी म्हातारी उभी होती, त्या ठिकाणी ना कोणता विजेचा दिवा होता, ना यांच्याव्यतिरिक्त इतर कुणी व्यक्ती! त्या भयाण काळोखात ती एकटी म्हातारी काय करत होती? याचा पत्ता दोघांपैकी कुणालाच लागत नव्हता. पण एक, म्हातारी ज्या ठिकाणी उभी होती, त्या शेजारी दोन रस्ते होते. डाव्या बाजूचा रस्ता नक्कीच हायवेला जात असणार असे भरतला वाटले. आपला फार्म हाऊस तर उजव्या दिशेला आहे तर नक्कीच उजव्या रस्त्याने जाणे योग्य ठरेल म्हणून सुसाट असणाऱ्या बाईकला भरतने उजव्या बाजूला जाण्याचे ठरवले.
म्हातारी उजव्या बाजूच्या रस्त्याकडेलाच उभी होती. त्या काळोखात जशी गाडी पुढे जाऊ लागली. ती म्हातारी त्या दोघांना हातवारे करू लागली. दोन्ही हात वरती करून काही तरी इशारे करू लागली. भावेश आधीच घाबरला होता, भरतने त्याला मागे वळून न पाहण्याचा सल्ला दिला. रस्त्याला चिरत गाडी अचानक थांबली आणि जिथे थांबली त्या पुढे रस्ताही नव्हता. तिथे होता स्मशान! ख्रिश्चन धर्मियांच्या त्या Graveyard मधून लवकर बाहेर निघण्यासाठी दोघांनी प्रयत्न सुरु केले पण नक्की काय करावे? हे कळेना. दोघांच्या फोनची बॅटरीही अचानक उतरली होती, त्यामुळे कुणाला फोन करणेही अशक्य होते.
अचानक गाडी सुरु झाली. भरतने गाडी वळवली. भावेशला म्हणाला की मागे वळतोय खरं! पण पुन्हा आपल्याला त्या म्हातारीचे भूत दिसेल. एक काम करूयात, वाटेत जे घर मिळेल, त्यांच्याकडे जाऊ आणि किमान अर्ध्या तासासाठी आम्हाला आसरा द्या, अशी विनंती करू. आपण यात अडकून राहिलो तर आज आपला शेवट ठरेल. आता कुणाकडे जाणे हाच एक यातून बाहेर निघण्याचा मार्ग आहे.
दोघेही वाटेत येणाऱ्या घरांकडे लक्ष ठेवून असतात. वाटेत घरं तर अनेक असतात पण सगळ्यात विचित्र बाब म्हणजे सगळ्या घरांना कुलूप असते. या दोघांना यातून बाहेर निघण्याच्या कोणताही मार्ग दिसत नसतो. ते पुन्हा त्या टिटावर येऊन पोहचतात. तिथे ती म्हातारी अजून उभी असते. पण यावेळी ती शांत असते. गाडी जशी तिच्या जवळून जाते. ती या दोघांकडे बघून जोरजोरात हसू लागते आणि विचित्र आवाजात म्हणते “थंय वचूंक नाका अशें हांवें पयलींच सांगिल्लें! (मी पाहिलंच सांगितलं होतं.. तिथे जाऊ नका!).
भरतने तिचे भयानक हावभाव पाहिले पण त्याने गाडी थांबवली नाही. तो सुसाट तिच्या कडेने निघून गेला जेव्हा त्याने आरशात मागे पाहिले तर तिथे ती म्हातारी नव्हतीच. ती अचानक गायब झाली होती. हे दोघे पुन्हा त्या क्लबकडे येऊन पोहचले. त्यांनी आपला फोन पाहिला तर आता फोन चार्ज दाखवत होता. त्यांनी तिथे उभे असणाऱ्या व्यक्तींपैकी एकाला घडलेली संपूर्ण बाब सांगितली. त्या माणसाने त्यांना दुसऱ्या पर्यायी रस्त्याने जाण्याचे सांगितले. त्या रस्त्याने हे दोघे त्यांच्या फार्म हाऊसवर अगदी सुखात पोहचले.
भावेश संपूर्णपणे तापाने फणफणला होता तर भरतला स्वप्नात त्याच गोष्टी दिसल्या ज्या वास्तवातही घडल्या होत्या फरक इतकाच की स्वप्नात बाईकवर भरत एकटाच होता. भरतला अजूनही कसली तरी किणकिण वाटत होती. सकाळ होताच त्याने एका ज्योतिषाला फोन करून सगळा थरार सांगितला. तेव्हा ज्योतिषाने भरतला त्या म्हातारीचे साधारण वय विचारले, तेव्हा भरतने त्याला सांगितले की जवळजवळ साठीच्या रेषेत असेल! तेव्हा ज्योतिषाने सांगितलं की ती म्हातारी जेव्हा हातवारे करत होती तेव्हा ती तुम्हाला तिथे जाऊ नका असे सांगत होती आणि ती म्हातारी दुसरं तिसरं कुणी नसून ती तुझी आजीच होती!
भरतची आजी त्याला या संकटातून दूर ठेवण्यासाठी स्वतः तिथे आली होती, असं त्यांचं म्हणणं होतं.
टीपः हा लेख केवळ मनोरंजन आणि माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरविण्याचा Navarashtra.com चा हेतू नाही.






