The living ghost mother andheri horror story in marathi
किरण रघुचा खास मित्र! किरण तसा पनवेलला राहतो. काही कामानिमित्त यांची भेट झाली होती, तेव्हापासून या दोघांची चांगलीच गट्टी जमली. अंधेरीला राहणारा रघुच्या भेटीसाठी किरण रघुला न सांगता मुंबईच्या जुहू चौपाटीला आला. किरण तसा मुंबईत कामानिमित्तच आला होता. काम आपटून संध्याकाळच्या प्रहरी समुद्राची खारी गार हवा अनुभवण्यासाठी आणि मुख्य म्हणजे रघुची गाठभेट घेण्यासाठी जुहू चौपाटी गाठली. रघुला कॉल करून सांगितले की,”भावा, जुहू चौपाटीला ये. मी तुझी वाट पाहतोय.” रघुही आनंदित झाला. रघु तसा नुकताच ऑफिसमधून निघाला होता. त्याने जुहू चौपाटी गाठली. किरणला पाहताच रघुने त्याला घट्ट मिठी मारली.
जुहू चौपटीचा सूर्यास्त पाहता आणि छानपैकी भेळपुरी खाता त्यांनी संध्याकाळ घालवली. चौपाटीच्या किनारीच असलेल्या खाऊ गल्लीचा मोह त्यांना आवरला नाही. दोघांनी अनेक छान छान खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. पाहता पाहता रात्रीचे 10 वाजले. गप्पा गोष्टी करत केव्हा इतका वेळ झाला? याचा सुगावाही त्यांना लागला नाही. किरण वेळ पाहून गडबडला. म्हणाला की,”फार वेळ झाला रे! आपण गप्पा गोष्टींमध्ये इतके हरवलो की आपल्याला वेळेचे भानच राहिले नाही.”
किरण तसा पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात राहणारा त्याला मुंबईच्या प्रवासाची खासकरून रात्रीच्या प्रवासाची फार सवय नव्हती व तसा अनुभवही नव्हता. तो रघुला म्हणतो,”रघु, तसाही उद्या माझं फार काही काम नाही आणि उशीर ही फार झाला आहे. तर मी आजची रात्र तुझ्या घरी राहू शकतो का?” हे ऐकून रघूच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलतात. त्याच्या कपाळावर आट्या येतात. त्याच्या अंगातून घामाच्या धारा सुटतात. त्याला “काय करावे काय नाही?” असे होते. किरण पाहतो की तो अगदी विचारांच्या खोलीत जाऊन बुडाला आहे. किरण त्याला हाक मारतो, “काय रे? ठीक आहेस ना. घरी येऊ ना. त्यानिमित्ताने तुझ्या घरातल्यांशीही ओळख होईल.” रघु जबरदस्तीने चेहऱ्यावर हसू आणतो आणि म्हणतो,”हे बघ किरण, आपण इतक्या वर्षांनी भेटलोय. का नाही? आज आपण अख्खी मुंबई रात्रभर हिंडून काढू?” किरण थकलेला असतो. तो म्हणतो,”नको रे! मी फार थकलोय. आपण घरी जाऊयात. मी आरामही करेल आणि सकाळी गावी निघून जाईल.” किरणचा चेहरा खरंच फार थकलेला होता. ते पाहून रघुकडेही त्याला हो म्हणण्याव्यतिरिक्त पर्याय नव्हता.
दोघेही अंधेरीला राहत असलेल्या रघूच्या घराकडे निघतात. रघु विचारात असतो तसेच घराविषयी काही विचारलं तर टाळाटाळ करत असतो. या सगळ्या गोष्टी किरण बारकाईने पाहत असतो. अखेर ते दोघे इमारतीच्या खाली पोहचले. असे म्हणतात की मुंबई कधीही झोपत नाही पण मुंबईचा तो भाग किरणला क्षणोक्षणी बोचत होता. दोघेजण घराच्या दाराशी येऊन पोहचले. रघुने दार उघडला. किरण आणि रघु हॉलमध्ये सोफ्यावर येऊन पडले. किरण रघूचा विचारात हरवलेला चेहरा पाहतच होता, इतक्यात आतून एक गोड आवाज किरणच्या कानावर पडला. ‘रघु… आलास का रे?’ रघुने ही “हो, आई.” म्हणत उत्तर दिले.
रात्रीचे साडे अकरा झाले होते. किरण रघुला म्हणतो,”भावा, माझीही आईशी ओळख करून दे.” रघु त्याला शांत राहण्यास सांगतो. स्वयंपाक घरातून पुन्हा तोच गोड आवाज कानी पडतो. “रघु… कोणी आलं आहे का तुझ्यासोबत?” रघु उत्तर देतो,”हो, आई. मित्र आलाय.” त्यावर स्वयंपाकघरातून आईचे उत्तर येते की,” अरे व्व्हा! मग त्याला जेवूनच जायला सांग.” किरणच्या चेहऱ्यावर स्मितहास्य येते. किरणला जोरात वॉशरूम लागलेली असते. तो रघूला वॉशरूम कुठे असल्याचे विचारतो. रघु त्यावर नकार देत म्हणतो की,”चल, आपण बाहेर जाऊ.” किरणला नियंत्रण होत नसल्याचे सांगतो तेव्हा त्याच्या जबरदस्तीला कंटाळून रघु त्याला सांगतो,”जा… बाबा.. जा तिथे आत वॉशरूम आहे.”
किरण वॉशरूमच्या दिशेने आत जातो. तेव्हा स्वयंपाकघरात पाहताच, त्याच्या अंगातून घामाच्या धारा सुटतात. कारण स्वयंपाक घरात त्याला एक राक्षसी शरीर स्वयंपाक करताना दिसतो. डोळे बाहेर आलेले, रक्ताने माखलेले शरीर, अंगावर जखमा, शरीर जसे की भाजलेले आहे… अशी एक विकृती स्वयंपाक घरात जेवण तयार करत होती. ते पाहून कसलाही वेळ न घालवता, किरण हॉलमध्ये आला. रघूने त्याचा चेहरा पाहून त्याला म्हणाला की,” मी म्हणत होतो की आपण घरी नको जाऊयात. बाहेरच थांबू पण तू ऐकलं नाहीस.” दोघेही घाईघाईत घराबाहेर पडतात.
इमारतीपासून लांब येताच, किरण रघूला प्रश्न करतो की “तुझी आई…” रघु त्याला अर्ध्यातच थांबवून म्हणतो की,” हो, ती माझीच आई आहे. आहे ही आणि नाही ही. तिला जाऊन वर्षे झाली. पण ती अजूनही माझ्यासोबत आहे आणि मी असेपर्यंत ती माझ्यासोबतच असणार आहे. तिला मी कुठेही जाऊन देणार नाही.” इतकंच नव्हे रघुने किरणला त्याचे लग्न न करण्याचे कारणही स्पष्ट केले. असे म्हणतात की आजही रघु तिच्या आईसोबत तेथे वास्तव्य करतो.
(टीपः आम्ही देत असणारे हे आर्टिकल काही व्यक्तींसह घडलेले अनुभव आहेत. मात्र आम्ही कोणतीही अंधश्रद्धा पसरवत नाही तर हे आर्टिकल केवळ माहिती आणि मनोरंजनाकरिता असून Navarashtra.com यासाठी कोणतीही पुष्टी देत नाही)