
डिजिटल मासिकांची वाढतेय लोकप्रियता; ऑनलाईन सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ
मुद्रित मासिकांची मागणी काही प्रमाणात टिकून असली, तरी ती कमी होत असल्याचे प्रकाशकांनी स्पष्ट केले आहे. देशभरात ऑनलाइन सबस्क्रिप्शनमध्ये सातत्याने वाढ होत असून, डिजिटल माध्यमांवरील जाहिरातींनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. पर्याय म्हणून कागदाच्या वापरात घट होणे हा प्रकाशकांसाठी एक लाभदायक मुद्दा ठरत आहे.
या पार्श्वभूमीवर मराठी साहित्य विश्वातून चिंता व्यक्त होत आहे. ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि लेखक विश्वास पाटील यांनी अलीकडेच पुण्यात दिलेल्या मुलाखतीत मुद्रित मराठी मासिकांची परंपरा जवळजवळ संपुष्टात आल्याने नव्या लेखकांची मोठी पंचायत झाली आहे, असे स्पष्ट शब्दात त्यांनी सांगितले. त्यांच्या मते, मुद्रित मासिके ही नवोदित लेखकांसाठी पहिली आणि महत्त्वाची व्यासपीठे होती. या मंचांची घट झाल्याने लेखनाच्या संधी मर्यादित होत असून, नव्या आवाजांना समोर येणे कठीण होत आहे.
उपलब्धतेमुळे डिजिटल मासिकाला पसंती
डिजिटल मासिकांचा सर्वात मोठा लाभ म्हणजे त्यांची सहज उपलब्धता. वाचक कुठेही असला तरी स्मार्टफोन, टॅबलेट किंवा लॅपटॉपवर काही सेकंदांत मासिक डाउनलोड करून वाचन सुरू करता येते. मुद्रित आवृत्त्यांच्या तुलनेत कमी खर्चात उपलब्ध असलेली ही मासिके आर्थिकदृष्ट्या परवडणारी तर आहेतच, पण त्यासोबत व्हिडिओ, इन्फोग्राफिक्स, ऑडिओ क्लिप्ससारखी मल्टिमिडिया वैशिष्ट्येही देतात. त्यामुळे वाचनाचा अनुभव अधिक आकर्षक आणि माहितीपूर्ण ठरतो.