धूम्रपान न करताही फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका? 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
फुफ्फुसाचा कर्करोग म्हटलं की, बहुतेक लोकांना लगेच सिगारेट ओढणाऱ्या व्यक्तीचं चित्र डोळ्यापुढे येतं. पण ही प्रतिमा आता चुकीची ठरतेय. भारतात दरवर्षी असे हजारो रुग्ण सापडत आहेत, जे कधीच तंबाखूच्या धुराच्या संपर्कात देखील आलेले नसतात. त्यांना पूर्वी काही लक्षणं नसतात, पण जेव्हा निदान होते तेव्हा रोग आटोक्याबाहेर गेलेला असतो. एका भारतीय अभ्यासानुसार, आज १५-२०% फुफ्फुसाच्या कर्करोगाचे रुग्ण हे ‘नॉन-स्मोकर’ आहेत. विशेष म्हणजे या गटात शहरांतील तरुण वर्ग तसेच, गृहिणींचाही समावेश आहे. महिलांमध्ये तर हा धोका झपाट्याने वाढत आहे.
फुफ्फुसाचा कर्करोग ‘सायलेंट किलर’ ठरण्यामागची कारणे काय?
धूम्रपानाशिवायही भारतात फुफ्फुसं खराब करणारे अनेक अदृश्य धोके आहेत. शहरांतील वाढते वायुप्रदूषण, घरगुती चुलींसाठी वापरले जाणारे जैविक इंधन, जुन्या घरी असणारे रॅडॉन गॅस किंवा अस्बेस्टॉसचे कण, पूर्वीचे टी.बी. संक्रमणामुळे झालेले फुफ्फुसांतील स्कारिंग – हे सगळं एकत्रितपणे कर्करोगाचा धोका वाढवत आहे. त्यामुळे ‘नॉन-स्मोकर’साठीही हा रोग एक मोठं संकट बनतोय. पण खरी धोक्याची घंटा वाजते ती ‘उशिरा निदान’ झाल्यामुळे. सुरुवातीची लक्षणं सौम्य असतात, त्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि निदान झालं तेव्हा वेळ हातून निसटली असते.
जर तुमचा खोकला आठवड्यानंतरही थांबत नसेल, तर तो दुर्लक्षित करू नका. पावसाळ्यातील अॅलर्जी किंवा प्रदूषणमुळे खोकला होणं सामान्य आहे, पण नेहमीचे औषधोपचार निष्फळ ठरत असतील तर छातीचा एक्स-रे किंवा सीटी स्कॅन गरजेचा असतो. श्वास घ्यायला त्रास होणं, अगदी जिने चढताना दम लागणं, अंगात थकवा जाणवणं, अचानक वजन कमी होणं – ही लक्षणं कधीच हलक्यात घेऊ नयेत. छातीत दुखणं, तेही हसताना, श्वास घेताना किंवा खोकताना वाढत असेल तर तात्काळ तपासणी आवश्यक आहे.
जर वारंवार ब्रॉन्कायटिस किंवा न्यूमोनियाचे झटके येत असतील, आवाज कायम भरकल्यासारखा वाटत असेल किंवा चेहरा व गळ्याला सूज येत असेल, तर हे लक्षणं गंभीर आजाराचे संकेत असू शकतात. भारतीय समाजात ‘थोडं थांबून बघू’ ही वृत्ती आहे. परंतु फुफ्फुसाच्या कर्करोगात वेळ खूप महत्वाची असते. विशेषतः वायुप्रदूषणाने वेढलेल्या आपल्या देशात, वेळेत निदान हेच एकमेव उपाय आहे. लक्षणं कायमस्वरूपी दिसत असतील तर डॉक्टरांकडे जाणं टाळू नका.
आजच योग्य पावलं उचला – घरातील हवा शुद्ध ठेवा, धूम्रपान करणाऱ्यांच्या संपर्कापासून दूर राहा, स्वयंपाकघरात वायुवीजन उत्तम ठेवा आणि गरज असल्यास लो-डोस सीटी स्कॅन करून घ्या.
लेखक : डॉ. स्वप्नील बरावकर,
MBBS MD (पल्मनरी मेडिसिन), आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल