
फोटो सौजन्य - Social Media
आज २०२५ हे वर्ष निरोप घेत असून उद्यापासून नववर्षाची सुरुवात होत आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी आज सर्वत्र जल्लोष, पार्टी आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळते. क्लब, बार, हॉटेल, रेस्टॉरंट तसेच घराघरांत उशिरापर्यंत सेलिब्रेशन सुरू असते. या आनंदाच्या क्षणांत अनेक जण मित्रपरिवार व कुटुंबियांसोबत मद्यपानही करतात. मात्र, हा आनंद कधी कधी दुसऱ्या दिवशी त्रासदायक ठरतो. सकाळी उठल्यावर तीव्र डोकेदुखी, मळमळ, उलटी, थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागतो. ही स्थिती म्हणजेच ‘हँगओव्हर’. पार्टी नंतरची सकाळ जर जड डोक्याने आणि थकलेल्या शरीराने सुरू झाली, तर घाबरण्याचे कारण नाही. काही सोपे आणि घरगुती उपाय केल्यास हँगओव्हर कमी होऊ शकतो आणि शरीर पुन्हा ताजेतवाने वाटू लागते.
पाणी पिणे सर्वात महत्त्वाचे
हँगओव्हर झाल्यास सकाळी उठताच भरपूर पाणी पिणे अत्यंत गरजेचे आहे. मद्यपानामुळे शरीरातील पाणी कमी होते आणि डिहायड्रेशन होते. पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक लघवीद्वारे बाहेर टाकण्यास मदत होते. यामुळे डोकेदुखी हळूहळू कमी होते आणि शरीराला आराम मिळतो.
लिंबूपाणी देईल झटपट दिलासा
हँगओव्हरवर लिंबूपाणी हा एक प्रभावी घरगुती उपाय मानला जातो. एका ग्लास पाण्यात अर्धे लिंबू पिळून त्यात थोडे मीठ मिसळून पिल्यास शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता भरून निघते. यामुळे मळमळ, उलटी आणि डोकेदुखी कमी होण्यास मदत होते.
नारळपाणी देईल ऊर्जा
नारळपाणी हे नैसर्गिक ऊर्जा देणारे पेय आहे. मद्यपानामुळे शरीरातील आवश्यक मिनरल्स आणि पाणी कमी होते. नारळपाण्यात असलेले इलेक्ट्रोलाइट्स शरीराला पुन्हा ताकद देतात आणि थकवा दूर करण्यास मदत करतात.
पुदिना कमी करतो अस्वस्थता
पुदिन्याचा वापर हँगओव्हरच्या त्रासात उपयुक्त ठरतो. पुदिन्याच्या पानांचा रस पाण्यात मिसळून पिणे किंवा पुदिन्याची चहा घेतल्यास पोटाला थंडावा मिळतो. यामुळे मळमळ, गॅस आणि अस्वस्थता कमी होते.
हळदीचे कोमट पाणीही फायदेशीर
हँगओव्हर असताना हळदीचे कोमट पाणी पिणे देखील लाभदायक ठरते. हळदीमध्ये दाह कमी करणारे गुणधर्म असतात. यामुळे शरीरातील सूज, थकवा कमी होतो आणि शरीराला आतून शांतता मिळते.
एकूणच, नववर्षाच्या आनंदात केलेले मद्यपान जर दुसऱ्या दिवशी त्रासदायक ठरले, तरी काही सोप्या घरगुती उपायांनी हँगओव्हरवर मात करता येते. मात्र, आनंद साजरा करताना मर्यादा पाळणे आणि आरोग्याची काळजी घेणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे.