निसर्गातील घडामोडींवरून पाऊस केव्हा येईल याचा ठोकताळा बांधला जातो. काही पक्ष्यांच्या विशिष्ट हालचाली, विशिष्ट आवाज, घरटे बांधण्याच्या पद्धती यावरून सुद्धा पाऊस केव्हा येईल याचा अंदाज बांधला जातो. काही आदिम जमाती मध्ये आजही अशा गोष्टी प्रमाण मानल्या जातात. पावसाचे संकेत देणारे हे पक्षी कोणते आहेत वाचा खालीलप्रमाणे.
1) कावळा
पावसाची चाहूल लागताच पक्ष्यांची घरटी बांधायची लगबग सुरु होते. कावळा कसे आणि कुठे घरटे बांधतो यावरून सुद्धा पाऊस केव्हा येईल याचा अंदाज बांधता येतो. कावळ्याने झाडाच्या तीन बेचक्यामध्ये घर बांधले तर पाऊस चांगला होईल असे मानले जाते. आणि जर झाडाच्या शेंड्यावर घरटे बांधले तर मध्यम पाऊसकाळ समजला जातो. आंबा, वड, पिंपळ इत्यादी महावृक्षांवर कावळ्याने घरटे बांधले तर पाऊस चांगला पडेल असे समजले जाते तर सावर, बाभूळ अश्या काटेरी झाडांवर कावळ्याने घरटे बांधले तर पाऊस कमी पडतो असं मानलं जातं. कावळ्याने घरट्यात किती अंडी घातली यावरूनही पाऊस किती पडेल याचा अंदाज बांधता येतो. कावळ्याने एक अंडे दिले तर कमी पाऊस. दोन अंडी दिली तर अतिशय कमी पाऊस पडतो.
2) चिमणी
चिमण्या मातीत अंघोळ करत असतील तेव्हा चांगल्या पावसाचे संकेत मानले जातात.
3) तित्तर
तित्तर हा पक्षी मुख्यतः माळरानामध्ये आढळतो. त्याच्या अंगावर काळ्या पांढऱ्या रंगाचे ठिपके असतात. तित्तर पक्षांचे थवे ‘कोड्यान केको कोड्यान केको’ अश्या स्वरात ओरडू लागले की पाऊस येतोच असा संकेत आहे.
4) चातक पक्षी
चातक पक्षी हा आफ्रिकेतून भारतात स्थलांतरित होतात. असे म्हणतात कि चातक पक्षी येताना सोबत पाऊस घेऊनच येतो. पाऊस वेळेवर येणार असेल तर चातक पक्षीसुद्धा लवकर येतात. पण चातकाचे आगमन उशिरा झाल्यास पाऊस पण लांबणीवर जातो असा पक्षीतज्ञानचा अनुभव आहे. ‘पिऊ… पिऊ या त्यांच्या सांकेतिक आवाजात ओरडू लागले कि समजून जायचं मृगाची धार आता कोसळणार आहे.
5) पावशा पक्षी
पावशा पक्षी हा रानावनात आढळतो. तो विशिष्ट अश्या ‘पेर्ते व्हा पेर्ते व्हा’ आवाजात ओरडतो तो अश्या आवाजात ओरडायला लागला कि शेतकऱ्यांच्या मशागतीच्या कामांना वेग येतो. कारण मान्सून येणार याचीच ती चाहूल असते.
निसर्गातील घडामोडींवरून पाऊस केव्हा येईल याचा ठोकताळा बांधला जातो. काही पक्षाच्या विशिष्ट हालचाली, विशिष्ट आवाज, घरटे बांधण्याच्या पद्धती यावरून सुद्धा पाऊस केव्हा येईल याचा अंदाज बांधला जातो. काही आदिम जमाती मध्ये आजही अश्या गोष्टी प्रमाण मानल्या जातात.