फोटो सौजन्य - Social Media
आपण अनेकदा ‘इडा पीडा टाळू दे, बळी राजाचे राज्य येऊ दे’ ही म्हण ऐकली असेल. मुळात, आजच्या काळात बळीराजा म्हणजे शेतकरी असा समज झाला आहे. पण बळीराजा हा शब्द पुराणांमधून आला आहे. बळीराजा म्हणजेच महाबली! महाबली हा असुर सम्राट असून भगवान विष्णूचा फार मोठा भक्त होता. हिरण्यकश्यपूचा पिढीत जन्माला आलेला प्रल्हादाचा हा नातू! तसेच विरोचकाचा मुलगा! बळीच्या या राज्यात प्रजा अगदी सुखात होती. नांदत होती. एक उत्तम प्रशासक म्हणून बलीकडे पाहिले जात होते.
प्रजेलाही बळीवर खूप प्रेम होते. बळीने फक्त प्रजेचे हृदय नाही तर संपूर्ण पृथ्वी जिंकली होती. त्याचे राज्य इतके विशाल होत होते की त्याची चाहूल स्वर्गात लागली होती. बळीने स्वर्ग जिंकण्यास सुरुवात केली होती. त्याच्या या विजयाने इंद्र देव फार डगमगून गेले. स्वर्गात सर्वीकडे भीतीचे वारे वाहू लागले. कारण बळीने स्वर्ग जिंकला तर स्वर्गाचा राजा इंद्राचे काय होणार? त्यामुळे इंद्राने भगवान विष्णूंचा मार्ग धरला. विष्णूही हतबल होते कारण शेवटी बळी त्यांची निस्सीम भक्ती करणारा भक्त होता. पृथ्वीवर त्याला एक मनाचे स्थान होते कारण तो कल्याणकारी शासक होता आणि अशा भक्ताचे वध करणे विष्णूंना शक्य नव्हते.
अशामध्ये भगवान विष्णूंनी शक्कल लढवली. त्यांनी बाल भटरुपी वामन अवतार घेतला. त्यांनी बळीला दर्शन दिले. बळीकडून एक मागणी केली की, “जिथपर्यंत माझे तीन पाऊले जातील, तितका भूभाग तू माझ्या नावे कर.” बळी त्यांची ही मागणी मान्य करतो. वामन आकाराने इतके विशाल होत जातात की त्यांच्या तीन पाउलांमधील एका पाऊलात संपूर्ण पृथ्वी ताब्यात येते. दुसऱ्या पाऊलात स्वर्ग तर तिसरे पाऊल ठेवण्यासाठी जागा नसल्याने बळी स्वतः त्याचे मस्तक पाऊल ठेवण्यासाठी पुढे करतो.
बळीच्या भक्तीने विष्णूचे मन भारावून जाते. विष्णू बळीला पाताळाचा शासक म्हणून घोषित करतो तसेच चिरंजीवी होण्याचे वरदान देतो.