सर्पदंशावरील लसीकरण
मुंबई/ नीता परब: राज्यभर पावासाने थैमान घातले आहे. त्यात मराठवाड्यात पावसामुळे सर्प, विंचू प्राणी घराघरात आढळून येत आहेत. याचबराेबर ठाणे जिल्ह्यातील सर्पदंश रुग्णांमध्ये अलीकडे वाढ झाली आहे. सर्पदंशामुळे अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. याचबराेबर येत्या काही दिवसात ऑक्टाेबर तडाख्याला देखील सुरुवात हाेणार आहे ज्यात सर्प आढळून येण्याचे प्रमाण वाढते.
याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सकारात्मक निर्णय घेत, हाफकीन संस्थेकडील सर्पदंशावरील तयार असलेली दीड लाख प्रभावी व परिणामकारक लसींची खरेदी महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाने हाफकीनमार्फत करावी,अशा सूचना उपमुख्यंत्री अजित पवार यांनी मंगळवारी दिल्या आहेत. या निर्णयामुळे महाराष्ट्र राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये येत्या काही दिवसात या लसी उपलब्ध हाेतील असे हाफकीनच्या व्यवस्थापकीय संचालकांकडून सांगण्यात येत आहे. प्रभावी लस व याेग्य वेळेत उपाचारामुळे नागरिकांचे जीव वाचण्यास माेलाची मदत हाेईल हे मात्र निश्चित.
हाफकीन संस्थेचे सर्पदंश औषध वर्षानुवर्षे गुणवत्ताधारक
हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाचे सर्पदंश प्रतिविष (अँटी स्नेक व्हेनम सिरम) हे औषध पोलीव्हॅलेंट आहे. सर्व प्रकारच्या विषारी सापांवरती हे औषध परिणामकारक आहे. भारतामधील कोणत्याही भागातील कोणत्याही प्रकारचा विषारी सापाचा दंश जरी झाला तरी त्यावर हे औषध परिणामकारक आहे.
भारतामध्ये मुख्यतः नाग, मण्यार, घोणस, फुरसे या चार सापांच्या प्रजाती या विषारी आहेत; इतर प्रकारचे साप हे बिनविषारी या प्रकारात माेडले जातात. सर्पदंश झालेला रुग्ण उपचारासाठी दवाखान्यात गेल्यावर तेथील डॉक्टर कोणत्या प्रकारचा साप चावला हे विचारतात आणि त्यानुसार उपचार करतात.
मुलांच्या लसीकरणाचे वेळापत्रक चुकल्यास असे करा कॅचअप लसीकरण, जाणून घ्या सविस्तर माहिती
हाफकीन संस्थेचे सर्पदंश प्रतिविष औषध पोलीव्हॅलेंट
हाफकीन महामंडळाचे सर्पदंश प्रतिविष हे इंजेक्शन सर्व प्रकारच्या विषारी सापांवर गुणकारक आहे. हाफकिन महामंडळाच्या सर्पदंश प्रतिविष या औषध गुणकारी असल्याने रुग्ण लवकर बरा होतो आणि कमी डोस मध्ये रुग्णाचा जीव वाचतो. पद्मश्री डॉक्टर प्रकाश आमटे हे १९७४ सालापासून हाफकिन महामंडळाचे सर्पदंश प्रतिविष औषध वापरून हेमलकसा येथील रुग्णांचे जीव वाचवत आहेत.
इंजेक्शन तयार करण्याच्या प्रक्रियेला लागतात नऊ महिने
हाफकीन महामंडळाचे सर्पदंश प्रतिविष इंजेक्शन हे घोड्यांच्या रक्तांपासून बनते या प्रक्रियेला नऊ महिने लागतात. हे औषध लाईफोलाइज या फ्रान्स तंत्रज्ञानाच्या आधारे बनत असल्यामुळे ते शीतगृहामध्ये किंवा रेफ्रिजरेटर मध्ये ठेवायची गरज नसते; सामान्य तापमानात देखील हे औषध राहते. त्यामुळे सर्पदंश प्रतिविष इंजेक्शन आपण कपाटामध्ये किंवा बॅगेमध्ये ठेवू शकतो. डोंगराळ प्रदेशात ट्रेकिंगला जाताना किंवा जंगल सफारी करताना सर्पदंश प्रतिविष इंजेक्शन स्वतःजवळ ठेवण्यात यावे, असा सल्ला तज्ज्ञ देतात.
व्हायरल न्यूमोनियावरील लसीकरण, कोणत्या लस घेणे आवश्यक सांगताहेत तज्ज्ञ
रुग्णांना मिळतेय जीवनदान!
‘सध्या हाफकीनकडे सर्पदंशावरील दीड लाख लस तयार आहेत. सर्पदंशावरील हाफकीनने तयार केलेली लस प्रभावी व परिणामकारक आहे. या लसींची खरेदी महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाने हाफकीनमार्फत करण्यात येणार आहे. ज्या-ज्यावेळी देश अथवा राज्यावर काेणतीही नैसगिर्क आपत्ती आली, त्यावेळी हाफकीन महामंडळाने नेहमीच वैद्यकीय मदत केली आहे. हाफकीन संस्थेची लसीची गुणवत्ता विश्वासार्हतामुळे रुग्णांना जीवदान मिळत आहे, ही बाब हाफकीन संस्थेसाठी सकारात्मक आहे.’ – सुनील महिंद्रकर, व्यवस्थापकीय संचालक, हाफकीन जीव औषध निर्माण महामंडळ