फोटो सौजन्य - Social Media
आपण पुस्तकं नेहमी एकाच प्रकारात पाहिली आहेत: सरळ, चौकोनी किंवा आयताकार. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की पुस्तकांचा आकार नेहमी चौकोनीच का असतो? हे काही नियमामुळे आहे का, की केवळ परंपरेमुळे? की यामागे अशी काही शास्त्रीय आणि डिझाईनशी संबंधित कारणं आहेत, जी आपल्या लक्षातच आलेली नाहीत? मोबाईल, गाड्यांचे मॉडेल्स, खुर्च्यांचा आकार यात सतत प्रयोग होत असताना, पुस्तकांच्या बाबतीत मात्र आपण इतके ‘गंभीर’ का आहोत? चला तर मग जाणून घेऊया या मागचं खरं कारण.
चौकोनी किंवा आयताकार पुस्तकं स्टॅक करणे, शेल्फमध्ये व्यवस्थित ठेवणे, बॅगेत भरून नेणे किंवा एकावर एक रचणे खूप सोपे असते. उलट, जर पुस्तकं गोल किंवा त्रिकोणी असती, तर ती सांभाळणं, नेणं आणि जपणं एक डोकेदुखी ठरली असती. गोल पुस्तकं बॅगेत सतत फिरत राहिली असती, त्रिकोणी पुस्तकांचे कोपरे मोडले गेले असते आणि लायब्ररीत त्यांच्यासाठी योग्य जागाच मिळाली नसती.
प्रिंटिंग मशीनमध्ये जे मोठ्या आकाराचे पेपर शीट्स वापरले जातात, ते आयताकार असतात. त्यांना कापून फोल्ड करून पुस्तकाच्या स्वरूपात आणणं सर्वात सोयीचं आणि कमी वेस्टेज करणारं तंत्र आहे. जर पुस्तकं गोल किंवा त्रिकोणाच्या आकारात बनवली गेली, तर वेळ, खर्च आणि कागदाचा अपव्यय खूपच वाढला असता. आपण पुस्तक वाचताना डोळे डावीकडून उजवीकडे आणि वरून खाली हलवतो. आयताकार पानं ही वाचनाच्या या नैसर्गिक पद्धतीसाठी सर्वात योग्य ठरतात. गोल किंवा त्रिकोणी पानांवर मजकूर बसवणं अवघड असतं आणि जागेचा अपव्ययही होतो.
पूर्वीच्या काळात लोक स्क्रोल्समध्ये म्हणजेच गुंडाळलेल्या कागदांवर मजकूर लिहायचे. पण त्यांना वाचणं खूपच कठीण होतं. सतत स्क्रोल उघडावं लागे. जेव्हा पुस्तकांचा शोध लागला, तेव्हा आयताकार स्वरूप सर्वात सोयीचं वाटलं. हळूहळू हेच स्वरूप सवयीचं झालं आणि आज एक मानक बनलं. पुस्तकं केवळ वाचण्यासाठी नसतात, ती छापावी लागतात, डिझाईन करावी लागतात, बांधावी लागतात आणि वाहूनही न्यायची असतात. या सर्व प्रक्रिया आयताकार किंवा चौकोनात सर्वात सोप्या, किफायतशीर आणि वेळ वाचवणाऱ्या ठरतात. त्यामुळे प्रकाशकांसाठीही हाच आकार फायदेशीर असतो.
तर मग गोल किंवा त्रिकोणी पुस्तकं कधीच बनली नाहीत का?
नक्कीच बनली! काही आर्टिस्टिक किंवा मुलांच्या पुस्तकांसाठी गोल, तारा किंवा दिलाच्या आकारातील पुस्तकं तयार करण्यात आली आहेत. मात्र ती फारशी प्रचलित झाली नाहीत कारण त्यांचा वापर, छपाई आणि साठवणूक कठीण होती. म्हणूनच, पुस्तकांचा चौकोनी आकार हा फक्त योगायोग नसून, अनेक वर्षांच्या व्यावहारिक अनुभवातून आलेली एक शहाणीव आहे, जी वाचकांची सोय, उत्पादनाची सोय आणि शास्त्रीय कारणं या सगळ्यांचा संतुलित विचार करून ठरवलेली आहे. आणि त्यामुळेच आजही आपण चौकोनी पुस्तकंच वाचतो आणि कदाचित पुढेही वाचत राहू!