फोटो सौजन्य - Social Media
असुरक्षितता असो वा कुणाबद्दल जिव्हाळा, कुणाला अभिनंदन करायचो असो वा कुणाला निरोप, प्रत्येकवेळी एक सामान्य क्रिया केली जाते, ती म्हणजे ‘मिठी मारणे’. मिठी मारणे हा प्रेम, आधार आणि आपुलकी व्यक्त करण्याचा सर्वमान्य आणि सुंदर मार्ग आहे. हा एक साधा कृतीप्रकार असूनही त्यातून न सांगता येणाऱ्या भावना व्यक्त होतात. माणसं एकमेकांना वेगवेगळ्या कारणांनी मिठी मारतात — आनंद व्यक्त करण्यासाठी, दुःखात आधार देण्यासाठी, प्रेम दाखवण्यासाठी किंवा सहानुभूती व्यक्त करण्यासाठी. परिस्थितीनुसार त्या मिठीचा अर्थ असतो.
मिठी मारण्याचा मुख्य उद्देश म्हणजे सामाजिक नातेसंबंध बळकट करणे. एक उबदार मिठी एखाद्याला आपल्यासाठी महत्त्वाचा असल्याचा आणि सुरक्षिततेचा संदेश देते. वाढदिवस, यशस्वी क्षण, पुनर्भेट यांसारख्या आनंदाच्या प्रसंगी मिठी हे आनंदाचे प्रतीक असते. तसंच दुःखद प्रसंगी एक साधी मिठीही सहानुभूतीचा आणि सांत्वनाचा इशारा असतो. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहता, मिठी मारण्याचे शरीरावर आणि मनावर सकारात्मक परिणाम होतात. मिठी मारल्यावर शरीरात ‘ऑक्सिटोसिन’ नावाचा हार्मोन स्रवतो, ज्याला “प्रेमाचा हार्मोन” म्हटले जाते. हा हार्मोन तणाव कमी करतो, रक्तदाब नियंत्रित ठेवतो आणि नात्यांमधील विश्वास दृढ करतो. मिठीमुळे सेरोटोनिन आणि डोपामाइन यांसारखे न्यूरोट्रान्समीटर्सही स्रवत असतात, जे आनंद आणि समाधानाची भावना वाढवतात.
मिठी मारल्याने शारीरिक आरोग्यालाही फायदे होतात. संशोधनानुसार, नियमित मिठ्या मारल्यास तणाव कमी होतो आणि हृदयाचे आरोग्य सुधारते. मिठीमुळे शरीराचा हृदय गती दर कमी होतो आणि शांतता लाभते. त्यामुळे तणावग्रस्त परिस्थितीतही मनावर सकारात्मक परिणाम होतो. भावनिक दृष्टिकोनातून पाहता, मिठी मानसिक धैर्य वाढवते. लहान मुलांना पालकांकडून मिळणाऱ्या मिठ्या त्यांना सुरक्षिततेची भावना देतात आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवतात. मोठ्या वयातदेखील मिठी हा जिव्हाळ्याचा आधार ठरतो.
प्रेमसंबंधांमध्ये मिठीचे महत्त्व अनन्यसाधारण असते. दीर्घकाळासाठी मारलेली मिठी जोडीदारांमधील भावनिक बंध अधिक घट्ट करते आणि जवळीक वाढवते. मित्रमैत्रिणींसाठीही एक प्रामाणिक मिठी परस्पर आदर आणि निष्ठेचे प्रतीक ठरते. एकंदरीत मिठी म्हणजे केवळ शारीरिक कृती नसून ती मानवी नात्यांचे प्रतीक आहे. आनंद असो वा दुःख, मिठीमध्ये नातेसंबंध अधिक मजबूत करण्याची ताकद असते. त्यामुळे कधीही मिठीचे महत्त्व कमी लेखू नका — कदाचित तीच कोणाला आधार आणि प्रेमाची जाणीव करून देण्याचा आवश्यक क्षण ठरू शकते.