आयव्हीएफ उपचार
इन-व्हिट्रो फर्टिलायझेशन, अर्थात आयव्हीएफने जगभरातील लाखो जोडप्यांना स्वतःचे मूल होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यात मदत केली आहे. आज आयव्हीएफ जवळपास सगळ्यांना माहिती आहे, जगभरात त्याचा वापर केला जातो आणि असे असून देखील या उपचार पद्धतीबाबत अनेक गैरसमज देखील आहेत.
मुंबईच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलचे आयव्हीएफचे कन्सल्टंन्ट डॉ. हितेशा रामनानी रोहिरा यांनी आयव्हीएफबद्दलचे काही गैरसमज दूर करून सत्य परिस्थिती आपल्यासमोर मांडली आहे. (फोटो सौजन्य – iStock)
गैरसमज: आयव्हीएफ कोणत्याही वयात करता येऊ शकते
सत्य: आपले वय जसजसे वाढत जाते तसतसे आपल्या शरीरातील प्रजनन यंत्रणेचे देखील वय वाढते. निरोगी भ्रूण निर्माण होण्यासाठी पुरेशा प्रमाणात अंडी निर्माण करण्याची क्षमता अधिक जास्त वयामध्ये महिलेच्या शरीरात उरलेली असेलच असे नाही. गर्भधारणा करण्याची क्षमता वयोमानापरत्वे कमी होत जाते, परिणामी, आयव्हीएफ यशस्वी होण्याचा दर देखील कमी होतो.
गैरसमज: आयव्हीएफमार्फतच्या सर्व प्रसूती सी सेक्शनने होतात
सत्य: आयव्हीएफमुळे होणारी गर्भधारणा ही नैसर्गिक गर्भधारणेपेक्षा वेगळी नसते. गर्भारपणात काही समस्या उद्भवल्यास सी सेक्शन करावे लागू शकते, अशा समस्या फक्त आयव्हीएफमध्येच होतात असे नाही तर सर्वसामान्य गर्भधारणेत देखील होऊ शकतात. उदाहरणार्थ, आयव्हीएफमार्फत गर्भधारणा करवून घेणाऱ्या महिलेचे वय जर जास्त असेल तर ती धोका टाळण्यासाठी योनिमार्गाद्वारे प्रसूतीच्या ऐवजी सिझेरियन प्रसूतीच्या पर्याय स्वीकारू शकते.
हेदेखील वाचा – स्पर्म फ्रिझींग म्हणजे नेमकं काय? कशी आहे प्रक्रिया जाणून घ्या सविस्तर
गैरसमज: आयव्हीएफचे अनेक साईड इफेक्ट्स असू शकतात
आयव्हीएफचे दुष्परिणाम ?
सत्य: इतर कोणत्याही प्रक्रियेमध्ये जसे असतात तसे काही साईड इफेक्ट्स आयव्हीएफमध्ये देखील असतात पण अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे आता त्यांचा प्रभाव खूपच कमी असतो. पोटात सौम्य वेदना, बद्धकोष्ठता असे काही सर्वसामान्य साईड इफेक्ट्स आयव्हीएफमध्ये जाणवू शकतात, पण भरपूर पाणी पिऊन ते दूर करता येऊ शकतात. शरीरात हार्मोनल स्तर वाढल्याने स्तन मऊ पडू शकतात.
गैरसमज: आयव्हीएफमुळे कॅन्सर होण्याचा धोका वाढतो
सत्य: ओव्हरीयन टिश्यूमध्ये बदल घडवून आणणारे विविध पंक्चर्स तसेच अंडी उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक असलेल्या सेक्स हार्मोन्सचे स्तर वाढवण्यासाठी आयव्हीएफदरम्यान आवश्यक असलेल्या औषधांनीच हा गैरसमज दूर केला आहे. आयव्हीएफ उपचारांमुळे कॅन्सर होण्याचा धोका वाढतो हे सिद्ध करणारा एकही शास्त्रोक्त पुरावा उपलब्ध नाही.
गैरसमज: आयव्हीएफ खूप खर्चिक आहे
आयव्हीएफला येणारा खर्च
सत्य: आधी आयव्हीएफचा खर्च खूप जास्त यायचा पण तंत्रज्ञानामध्ये होत असलेल्या विकासामुळे आणि आता आयव्हीएफ सर्वत्र वापरले जात असल्याने हा खर्च खूप कमी झाला आहे.
हेदेखील वाचा – Isha Ambani ने IVF प्रक्रियेबाबत केला खुलासा, पॅरेंटिंगबाबत मांडले मत
गैरसमज: आयव्हीएफने जन्मणाऱ्या बाळांमध्ये जन्मतः विकृती असण्याचा धोका असतो
सत्य: दरवर्षी असिस्टेड रिप्रोडक्शन पद्धतीने जगभरात जवळपास २.५ मिलियन बाळे जन्माला येतात. फ्रोजन (गोठवून ठेवलेल्या) भ्रूणांचा ज्यामध्ये वापर केला जातो अशा साध्या आयव्हीएफ पद्धतींमार्फत निरोगी बाळे जन्माला येतात कारण फ्रीझिंग आणि थॉइंग प्रक्रियांमध्ये सदोष भ्रूण टिकून राहण्याची शक्यता खूपच कमी असते. खरेतर या प्रक्रियेमुळे पालकांना भ्रूणांची प्रत्यारोपण-पूर्व तपासणी करवून घेण्यात मदत मिळते, यामुळे खूप जास्त धोका असलेल्या परिस्थितींमध्ये जन्मजात समस्या उद्भवण्याची शक्यता कमी होते.
गैरसमज: आयव्हीएफने जुळी बाळे होतात
जुळ्या मुलांचा जन्म
सत्य: सुरुवातीच्या काळात या उपचारांमध्ये प्रक्रिया यशस्वी होण्याचा दर वाढवण्यासाठी अनेक भ्रूण महिलेच्या शरीरात सोडले जात असत. पण तंत्रज्ञानातील सुधारणांमुळे प्रत्यारोपणासाठी एका वेळी एकच निरोगी भ्रूण निवडणे लोकांना शक्य झाले आहे.
गैरसमज: आयव्हीएफ यशस्वी होण्याचा दर १००% असतो
सत्य: आयव्हीएफ यशस्वी होण्याचा दर वय, वंध्यत्वाचे कारण, अंड्यांची, स्पर्मची व निर्माण होणाऱ्या भ्रूणाची गुणवत्ता, हार्मोनल, बायोलॉजिकल स्थिती अशा अनेक घटकांवर अवलंबून असतो. ३५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या जोडप्यांमध्ये आयव्हीएफ यशस्वी होण्याचा दर जवळपास ४०% असतो.
गैरसमज: खूप जास्त जन्म टाळण्यासाठी भरपूर अंडी गोठवली जातात
सत्य: ओव्हरीयन रिझर्व्ह चांगला असेल तर आयव्हीएफ उपचार यशस्वी होण्यात मदत मिळते. त्यामुळे खूप मोठ्या संख्येने अंड्यांची गरज लागत नाही. जी व्यक्ती उपचार घेत आहे तिच्यावर या गोष्टी अवलंबून असतात. रक्ततपासणी करून आणि हार्मोन स्तराचे विश्लेषण करून तज्ञ अंड्यांची नेमकी संख्या ठरवू शकतात.
गैरसमज: आयव्हीएफमुळे हार्मोन्समध्ये गडबड होते/त्वचेच्या समस्या होऊ लागतात
आयव्हीबाबत गैरसमज
सत्य: वंध्यत्वामध्ये हार्मोनल असंतुलन हे खूप मोठे कारण असते. आयव्हीएफ हार्मोन इंजेक्शन्समध्ये फीमेल हार्मोन ओएस्ट्रोजेन असते जे एंडोर्फिन्स (मेंदूतील केमिकल्स) निर्माण करते जे आपल्यामध्ये सर्व काही आलबेल असल्याची जाणीव उत्पन्न करते. हार्मोन इंजेक्शन्स घेतल्यानंतर काही महिलांना ऍक्नेची समस्या होते.
तज्ज्ञांचे मत
पहिले IVF बाळ जन्माला येऊन आता ४० पेक्षा जास्त वर्षे उलटून गेली आहेत. तेव्हापासून आजपर्यंत रिप्रोडक्टिव्ह तंत्रज्ञानात अनेक सुधारणा घडून आल्या आहेत. आयव्हीएफला चांगले यश मिळत असल्याने त्याची लोकप्रियता खूप वाढली आहे, या प्रक्रियेबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी अनेक व्यक्ती उत्सुक असतात. पण दुर्दैव असे की माहिती जाणून घेण्याच्या प्रयत्नांत बऱ्याचदा चुकीची माहिती मिळू शकते किंवा गैरसमज निर्माण होऊ शकतात. आयव्हीएफबद्दलचे कित्येक गैरसमज खरोखरच खोटे आहेत तर काहींच्या बाबतीत माहितीमध्ये तफावत आहे. हे गैरसमज आणि माहितीमधील तफावत कायमची दूर होणे अत्यंत गरजेचे आहे. याकरिता योग्य डॉक्टरांकडून आणि फुल टाइम स्पेशालिस्ट सिस्टीम असणाऱ्या रुग्णालयात सल्ला घेणे उपयुक्त ठरेल.