मुंबईत घातपाताच्या कटाची शक्यता
मुंबई : सध्या दिवाळी सणामुळे सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे. त्यामध्येच आता महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. मुंबईत घातपाताच्या कटाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भाभा अणु संशोधन केंद्राचा बनावट शास्त्रज्ञ असल्याचा बनाव करणाऱ्या अख्तर हुसेन कुतुबुद्दीन अहमद या भामट्याला मुंबई गुन्हे शाखेने राष्ट्रीय तपास संस्था आणि गुप्तचर विभागाने संयुक्त कारवाई करत अटक केली.
भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने ही धक्कादायक अशी घटना आहे. यातील अहमदने स्वतःला भाभा अणु संशोधन केंद्राचा वरिष्ठ अणुशास्त्रज्ञ असल्याचे भासवून विविध ठिकाणी दिशाभूल करणारी कागदपत्रे आणि बनावट ओळखपत्रांचा वापर केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. सर्वांत गंभीर बाब म्हणजे, तपास यंत्रणांना त्याच्या निवासस्थानातून अणुबॉम्ब डिझाइनशी संबंधित 14 अत्यंत संवेदनशील नकाशे आणि अनेक गुप्त कागदपत्रे सापडली आहेत. या घटनेनंतर राष्ट्रीय सुरक्षेच्या पातळीवर प्रचंड खळबळ उडाली असून, अख्तरचा उद्देश नेमका काय होता, हे उलगडण्यासाठी केंद्र आणि राज्य यंत्रणा उच्चस्तरीय तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई गुन्हे शाखेला काही काळापासून एका संशयास्पद व्यक्तीच्या हालचालींबाबत माहिती मिळत होती. तो स्वतःला भाभा अणु संशोधन केंद्राचा वरिष्ठ अधिकारी असल्याचे सांगत होता. त्याच्या हालचालींवर नजर ठेवून कारवाई करताना पोलिसांनी अख्तर हुसेनला अटक केली. त्याच्या घराच्या झडतीत मिळालेल्या माहितीने तपास यंत्रणेला धक्काच बसला.
परदेशी गुप्तचर नेटवर्कशी संबंध असल्याचा संशय
सूत्रानुसार, प्राथमिक तपासात हे नकाशे देशांतर्गत तयार केलेले नाहीत, अशी शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे या प्रकरणाचा धागा परदेशी गुप्तवर नेटवर्कशी जोडला गेला असण्याची शंका व्यक्त केली जात आहे. अख्तर हुसेनकडे हे नकाशे कसे आले, त्यामागे कोणाचा हात आहे आणि या माध्यमातून घातपाताचा कट तर रचला नव्हता ना, याची चौकशी सध्या केंद्रस्थानी आहे.
तपास एनआयए-आयबीकडे
या प्रकरणाचा तपास आता राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) आणि गुप्तचर विभाग (आयबी) ने आपल्या हाती घेतला आहे. या प्रकरणाची चौकशी विविध दिशांनी सुरू आहे.
अनेकांना फसवल्याची माहिती समोर
अख्तरने मागील काही वर्षापासून भाभा अणु संशोधन केंद्राच्या नावाचा वापर करून अनेकांना फसवल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. त्याच्या सोशल मीडियावरील काही संपर्काचा तपास घेतला असता काही परदेशी नागरिकांशी त्याचे संवाद असल्याचे आढळले आहे.