मुंबई : मुंबईतील घाटकोपर येथे गेल्या सोमवारी (दि.13) जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला होता. त्यातच घाटकोपर परिसरात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे पेट्रोल पंपावरील लोखंडी होर्डिंग (Ghatkopar Hoarding Collapse) खाली कोसळलं होतं. यामध्ये आत्तापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला होता. मात्र, आता यात वाढ झाली असून, हा आकडा 17 वर गेला आहे.
घाटकोपरच्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आत्तापर्यंत 16 होती. मात्र, यामध्ये आणखी एकाची वाढ झाली आहे. वादळी वाऱ्यामुळे घाटकोपरच्या समता कॉलनीतील पेट्रोल पंपावर भलमोठं होर्डिंग कोसळलं होतं. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, अग्निशमन दल आणि पोलिसांची पथके घटनास्थळी रवाना झाली होती. सध्या बचावकार्य थांबवले असली तरी यातील मृतांची संख्या वाढताना दिसत आहे.
नेमकी कशी घडली घटना?
घाटकोपर पूर्वच्या द्रुतगती मार्गावर एक भलंमोठं होर्डिंग लावण्यात आलं होतं. मुसळधार पाऊस झाल्याने पेट्रोल पंपावरील लोखंडी होर्डिंग खाली कोसळलं. अचानक कोसळलेल्या या फलकाखाली अनेक गाड्या दबल्या गेल्या होत्या. जवळच पेट्रोल पंप असल्याने तिथे बचावकार्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे गेल्या 48 हून अधिक तास तिथे बचावकार्य चाललं होतं. पण जेव्हा हे बचावकार्य थांबवण्यात आलं. त्यावेळी मृतांचा आकडा हा 16 होता. मात्र, आता यामध्ये वाढ झाली आहे.
सेवानिवृत्त एटीसी व्यवस्थापकाचाही मृत्यू
या होर्डिंग दुर्घटनेत निवृत्त एअर ट्रॅफिक कंट्रोल व्यवस्थापक मनोज चान्सोरिया आणि त्यांची पत्नी अनिता या दोघांचाही समावेश आहे. बचावकार्य सुरु असताना त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते.