सरकारी कार्यालयातच शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
वाशिम : जिल्ह्यातील बहुतांश शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणा तसेच पिकलेल्या मालाला योग्य भाव नसणे आदी कारणांनी शेतकरी आत्महत्यांचे (Farmers Suicide) प्रमाण जिल्ह्यात मोठे आहे. मागील वर्षात ८३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
सध्याच्या चालू वर्षातील केवळ ४ महिन्यात १८ शेतकऱ्यांनी जीवन संपविले. मात्र, यापैकी बहुतेक शेतकरी आत्महत्या अपात्रतेच्या फेऱ्यात अडकल्याने मृत्यूनंतरही कुटुंबियांना मदत मिळत नसल्याचे भीषण वास्तव समोर आहे. दिवसेंदिवस शेती करणे शेतकऱ्यांना त्रासदायक होत आहे. वर्षभर घाम गाळून काळ्या मातीतून सोनं पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यात सिंचनाची फारशी सुविधा नसल्याने अनेकांना पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे.
कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा, खर्च अधिक व उत्पन्न कमी, शेतमालाचे घसरलेले दर, कर्जबाजारीपणा अशा अनेक कारणामुळे जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या होत आहेत. जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२३ या वर्षात ८३ शेतकरी आत्महत्यांची नोंद करण्यात आली. यामधून केवळ २८ शेतकरी आत्महत्या पात्र आहेत तर ४६ शेतकरी आत्महत्या अपात्र ठरविण्यात आल्या आहेत.
अपात्र शेतकरी आत्महत्या चिंताजनक
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील वारसांना मदत देण्यात येते. मात्र, त्यासाठी ती आत्महत्या शासनाच्या नियमानुसार ‘पात्र’ असावी लागते. परंतु जिल्ह्यात झालेल्या बहुसंख्य आत्महत्या ह्या अपात्र ठरविण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे मयत होऊनही कुटुंबावर मदतीसाठी संघर्ष करावा लागत आहे.