तासगाव : तासगाव येथील तासगाव ते तुरची दरम्यान जुना सातारा रस्त्यावरील येरळा नदीच्या पुलावरून पाणी वाहत आहे. या प्रवाहात एक वृद्ध जोडपे दुचाकीसह वाहून गेले. सोमवारी (दि. २६) दुपारी ही घटना घडली. ‘एनडीआरएफ’चे पथक शोध घेण्यासाठी दाखल झाले. मात्र शोध लागला नाही. मागील चार दिवसांपासून तालुक्यात आणि परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे येरळा नदीचे पात्र भरून वाहत आहे. जुना सातारा रस्त्यावरील तासगाव ते तुरचीच्या दरम्यान पुलावर चार दिवसांपासून दीड ते दोन फूट उंचीने पाणी वाहत आहे. प्रशासनाने हा पूल वाहतुकीसाठी बंद केला होता. मात्र काही नागरिक त्यातूनही वाट काढून पुलावरून ये-जा करत होते.
सोमवारी (दि. २६) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास तासगावहून तुरचीच्या दिशेने एक पुरुष आणि महिला दुचाकीवरून जात होते. या पुलावरून जात असताना तिथे उभ्या असणाऱ्या काही तरुणांनी पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे जाऊ नका, अशी विनंती केली होती. मात्र त्यातूनही हे जोडपे पाण्यातून पलीकडे जात असताना पाण्याचा प्रवाह वाढला. पुलावरून ते नदीपात्रात पडले आणि वाहून गेले.
पोलिसांचे पथक घटनास्थळी
घटनेची माहिती तासगाव पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्यासह पोलिसांचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले. पथकाने सुमारे दोन किलोमीटर अंतरापर्यंत शोध मोहीम राबवली. मात्र, शोध लागला नाही. सायंकाळी ही शोध मोहीम थांबवण्यात आली. वाहून गेलेल्या जोडप्याची ओळख समजू शकली नाही. तासगाव पोलिस तपास करीत आहेत.