चासकमान धरणातून 2200 क्युसेक विसर्ग सुरू; भीमा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
चासवाडा : खेड तालुक्याच्या धरण क्षेत्रात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरण जलसाठा झपाट्याने वाढत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सोमवारी (ता. ७) संध्याकाळी 6 वाजेपर्यंत धरणातून एकूण २२०० क्युसेकने विसर्ग भीमा नदीमध्ये सोडण्यात आला.
धरणाचे तीन दरवाजे प्रत्येकी २० सेमीने उचलून १८०० क्युसेक पाणी सांडव्याद्वारे, तर सकाळी ११ वाजता ४०० क्युसेक पाणी अतिवाहिनीद्वारे नदीत सोडण्यात आले. सध्या धरणात ८०.८९% म्हणजे ७.०८८ टीएमसी जलसाठा असून उपयुक्त साठा ६.१२ टीएमसी इतका आहे.
पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम
भीमाशंकर अभयारण्य आणि पश्चिम घाट परिसरात दमदार पावसाचा जोर कायम असून, २४ तासांत २३ मिमी आणि आतापर्यंत एकूण ३९८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. भीमा व आरळा नद्यांद्वारे दररोज सरासरी ४,००० क्युसेक पाण्याची आवक होत आहे. मागील वर्षी याच तारखेला केवळ ११.८६% साठा असलेले हे धरण यंदा ७०% अधिक साठ्याने परिपूर्ण झाल्याने खेड आणि शिरूर तालुक्यातील पाणीटंचाई दूर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पश्चिम भागात बंधाऱ्यांचा अभाव
धरण भरले असले तरी पश्चिम भागातील शेतकऱ्यांना त्याचा फारसा फायदा होत नाही, कारण नद्यांवर बंधाऱ्यांचा अभाव आहे. पाणी कालव्यांमार्फत फक्त पूर्व भागातील शिरूर आणि खेड तालुक्यांपर्यंतच पोहोचते.
भातपिकांचे मोठे नुकसान
मेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भातपिकाचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी रोपे कुजली आहेत, तर काही ठिकाणी रोपवाटिकाच तयार झालेली नाही. परिणामी, भात रोपांची किंमत वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. धरण साखळी परिसरात पावसाचा जोर कायम असल्यामुळे विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भीमा नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
पाणीपातळीचे आकडेवारी विवरण
सध्याची पाणीपातळी : ६४७.१५ दशलक्ष घनमीटर
एकूण साठा : २००.७० द.घ.मी.
उपयुक्त साठा : १७३.५१ द.घ.मी.
कळमोडी धरणाची आवकही आरळा नदीमार्गे चासकमानमध्ये होत आहे.