धक्कादायक! आमदार प्रसाद लाड यांचा AI द्वारे खोटा आवाज काढून 3.20 कोटींचा घोटाळा
भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्या नावाचा वापर करून बनावट लेटरहेड, खोट्या सही आणि एआयच्या (AI) सहाय्याने तब्बल 3 कोटी 20 लाखांचा निधी वर्ग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खुद्द आमदार लाड यांनी विधान परिषदेत याची माहिती दिल्यानंतर खळबळ उडाली आहे.
रत्नागिरी येथील एका अधिकाऱ्याला प्रसाद लाड यांच्या आवाजात एआय कॉल केला गेला होता. त्यात निधी तातडीने वर्ग करण्याची सूचना देण्यात आली. त्याचबरोबर खोटे पत्र व खोटी सही सादर करण्यात आली आणि बीड जिल्ह्यात हा निधी वर्ग झाला. या प्रकाराची शंका अधिकाऱ्याला आल्यावर त्यांनी थेट आमदार लाड यांच्याशी संपर्क साधला आणि खोट्या व्यवहाराचा पर्दाफाश झाला.
आमदार लाड यांनी सांगितले की, “काल (मंगळवारी) सायंकाळी 4.30 वाजता मला कॉल आला होता. त्या कॉलमध्ये निधीबाबत बोलण्यात आलं होतं. मात्र, आवाज बनावट होता आणि लेटरहेडवरील सहीही नकली होती. माझ्या नावाचा गैरवापर करून मोठा आर्थिक घोटाळा घडवण्यात आला आहे.”
या प्रकरणी सायन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस आयुक्त आणि मुख्यमंत्र्यांनाही घटनेची माहिती देण्यात आली आहे. लाड यांनी असेही नमूद केले की, “बीड जिल्ह्याचे नाव ऐकल्यावर मी अधिक सावध झालो.”
दरम्यान, प्राथमिक तपासात या घोटाळ्यात चार जणांची नावे पुढे आली आहेत. त्यापैकी एक बंडू नावाचा व्यक्ती असून तो सरपंच असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून लवकरच कारवाई केली जाईल, अशी माहिती आमदार लाड यांनी दिली.
बीड जिल्हा यापूर्वीही गुन्हेगारी आणि घोटाळ्यांमुळे चर्चेत राहिला आहे. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर जिल्ह्यातील प्रशासनाची विश्वासार्हता पुन्हा प्रश्नचिन्हांत सापडली असताना, आता हा नवा आर्थिक गैरव्यवहार समोर येणे म्हणजे धक्कादायकच आहे.