कोल्हापूरची पंचगंगा पाचव्यांदा पात्राबाहेर; संततधार पावासामुळे जिल्ह्यातील 45 बंधारे पाण्याखाली
कोल्हापूर : विश्रांती घेतलेल्या पावसाने गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा तुफान बॅटिंग सुरू केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे राधानगरी धरणाचे सर्व सात दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे राधानगरीसह वारणा, कुंभी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पारिणामी कृष्णेसह पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून, नदिकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ४५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे नदी, नाले तुडुंब भरुन वाहत आहेत. मागील दोन दिवसापासून पावसाचा जोर आणखी वाढल्याचे पाहायला मिळत आहे. कोल्हापूरची पंचगंगा नदी पाचव्यांदा पात्राबाहेर गेल्याचे पाहायला मिळत आहे. पंचगंगेची पाणीपातळी सोमवारी सायंकाळी ३१ फूट ४ इंचावर गेली असून, राजारामसह ४५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. हा पाऊस असाच सुरू राहिला तर जिल्ह्यातील काही मार्ग बंद होण्याची शक्यता आहे. परिणामी या मार्गावरील एसटी बस सेवा बंद पडणार आहे.
राज्यभरात पावसाचा जोर कायम असून, हवामान विभागाने विविध जिल्ह्यांत पावसाचा इशारा दिला आहे. राज्यातील बहुतांश भागात पावसाने दमदार हजेरी लावली असल्याचे पाहायला मिळत आहे.
जिल्ह्यातील अनेक बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. राधानगरी धरणाचे सातही स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आली आहेत. सातही स्वयंचलित दरवाज्यातून १० हजार क्यूसेक आणि पायथा विद्युतगृहातून १५०० क्यूसेक असा एकूण ११ हजार ५०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, पावसाचे प्रमाण, पाण्याची आवक लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार विसर्ग वाढविण्यात येणार आहे. नदीकाठावरील गावकरी, ग्रामस्थ, शेतकरी यांना नदीपात्रामध्ये उतरू नये, नदीपात्रालगत असणारे साहित्य, जनावरे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात यावीत. सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी, असे आवाहन कोल्हापूर पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी केले आहे. सोमवार दिवसभर पावसाची संततधार सुरूच असल्याने पंचगंगा, कृष्णा, दुधगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचे दिसून आले. पावसाचा जोर कायम राहिल्यास पंचगंगा नदी इशारा पातळी गाठण्याची शक्यता आहे.
दूधगंगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार
दूधगंगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक वाढली आहे. धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्याासाठी सोमवारी (दि. १८) सकाळी धरण सांडव्यावरून नदीपात्रामध्ये ४००० घनफूट प्रतिसेकंद विसर्ग सुरू झाला असून विद्युत निर्मिती केंद्रातून सुरु असणारा १५०० घनफूट प्रतिसेकंद व सांडव्यावरून सोडण्यात येणारा ४००० घनफूट प्रतिसेकंद असा एकूण ५ हजार ५०० घनफूट प्रतिसेकंद विसर्ग नदीपात्रमध्ये सोडला जात आहे. नदीपात्रामधील पाणी पातळी मध्ये लक्षणीय वाढ होत आहे.
कुंभीतून १ हजार ३०० क्यूसेक विसर्ग
कुंभी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. जलाशय परिचलन सूचीप्रमाणे धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून सोमवारी (दि. १८) सकाळपासून वक्र द्वाराद्वारे १ हजार क्यूसेक व विद्युतगृहातून चालू असणारा ३०० क्यूसेक असा एकूण १ हजार ३०० क्यूसेक विसर्ग कुंभी नदीपात्रात सोडण्यात आला आहे, त्यामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे.
राधानगरीतून ११ हजार ५०० क्यूसेक विसर्ग
राधानगरी धरणाच्या कालव्यातून सोमवारी पहाटे स्वयंचलित दरवाजा क्रमांक १ उघडला आहे. सर्व ७ दरवाजे उघडले आहेत. यामधून १० हजार क्यूसेक व पॉवर हाऊसमधून १ हजार ५०० क्यूसेक असा एकूण ११ हजार ५०० क्यूसेक विसर्ग नदी पात्रात सुरु आहे. रात्री व पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे शिंगणापूर बंधारा पुन्हा पाण्याखाली गेला आहे. बंधाऱ्यावरुन हाेणार वाहतूक बंद करण्यात आली आहे. वेधशाळेने २२ ऑगस्टपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
वारणेतून ६ हजार ६३० क्यूसेक विसर्ग
वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसाचे प्रमाण वाढल्याने धरणाच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. जलाशय परिचलन सूची प्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रीत ठेवण्यासाठी धरणातून वक्र द्वाराद्वारे ५ हजार क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. विद्युतगृहातून सोडण्यात आलेल्या विसर्गात वाढ करून तो १६३० क्यूसेक असा एकूण ६ हजार ६३० क्यूसेक विसर्ग वारणा नदीपात्रात सोडला जात आहे.