एका क्लिकवर मंजुर होणार 62967 घरकुले-- कुलदीप जंगम
सोलापूर : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा २ अंतर्गत शनिवारी (दि.22) एकाच दिवशी एका क्लिकवर 62967 घरकुल मंजुरीचे पत्र वितरण होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली. तसेच सदरचा राज्यस्तरावरील मुख्य कार्यक्रम पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे होणार असल्याचेही सांगण्यात आले.
सीईओ कुलदीप जंगम म्हणाले की, ‘सदरचा राज्यस्तरावरील मुख्य कार्यक्रम शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे येथे असून, राज्यातील यात 20 लाख घरकुलांची मंजुरीपत्र व 10 लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरण पुणे येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, ग्रामीण गृहनिर्माण विभागाचे संचालक डॉ. राजाराम दिघे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे.
तसेच जिल्हास्तरीय कार्यक्रम नियोजन भवन सात रस्ता सोलापूर येथे दुपारी 2 वाजता होणार असून, प्रातिनिधिक स्वरूपात घरकुलांच्या 500 लाभार्थ्यांना मंजुरी पत्र व अनुदान देण्यात येणार आहे. तसेच त्याच दिवशी प्रत्येक तालुक्यात प्रातिनिधिक स्वरूपात 300 लाभार्थी यांना व ग्रामपंचायत स्तरावर उर्वरित सर्वच लाभार्थी यांना मंजुरी पत्र व अनुदान देण्यात येणार आहे.
सदर जिल्हास्तरीय कार्यक्रमास सर्व खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, सर्व विभागप्रमुख यांना निमंत्रित करण्यात आले आहे. तरी सर्व लाभार्थी यांनी या घरकुल उत्सवासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. सुधीर ठोंबरे यांनी केले आहे.
काय आहे ही योजना?
केंद्र सरकारने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) सुरू केली आहे. मोदी फ्री हाऊस योजना अंतर्गत प्रत्येक गरीबाला आपलं घर मिळवून देण्याचा उद्देश आहे. PMAY ग्रामीण योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील लोकांना १,५०,००० रुपयांची मदत दिली जाईल, जे पूर्वी १,३०,००० रुपये होती.