उन्हाळ्याच्या सुट्टीत बाहेरगावी जाणाऱ्यांसाठी रेल्वेकडून खुशखबर; पश्चिम रेल्वेकडून 930 समर स्पेशल ट्रेन
मुंबई : प्रवाशांच्या सेवेसाठी भारतीय रेल्वेकडून नेहमीच प्रयत्न केले जातात. अनेक रेल्वेगाड्या सुरूही केल्या जातात. त्यात आता उन्हाळ्याच्या सुट्टीत बाहेरगावी जाणाऱ्यांसाठी रेल्वेकडून खुशखबर असणार आहे. एप्रिल-मे महिन्याच्या उन्हाळी सुट्टीत बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांच्या, पर्यटकांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वे प्रशासनातर्फे 930 समर स्पेशल ट्रेन चालविण्यात येणार आहे. देशातील विविध भागाकरिता या गाड्या चालविण्यात येणार असल्याची माहिती दिली जात आहे.
शाळा-महाविद्यालयांना एप्रिल महिन्यात उन्हाळी सुट्टी पडते. या सुट्टीत शहरातील नागरिक आपल्या मूळगावी जातात. त्यामुळे उन्हाळ्यात मेल-एक्सप्रेस गाड्यांना प्रचंड गर्दी असते. वेगवान आणि किफायतशीर प्रवासासाठी नागरिक रेल्वेला प्रसंती देतात. रेल्वेचे तिकिट 3 महिने आधी आरक्षित करता येते. यामुळे नियमित धावणाऱ्या गाड्या रिग्रेट होतात. प्रवाशांना आरक्षित तिकिट मिळत नाही. परिणामी, या प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेतर्फे दरवर्षी समर स्पेशल ट्रेन चालविण्यात येतात.
त्यानुसार, आता पश्चिम रेल्वेकडून 930 समर स्पेशल ट्रेन सुरु चालवल्या जाणार आहेत. तसेच स्पेशल गाड्यांना 300 जनरल, सेकंड क्लासचे कोच जोडण्यात येणार आहे. यामुळे विविध मार्गावरील प्रवाशांना गर्दीच्या वेळेस दिलासा मिळणार आहे.
देशाच्या विविध भागात विशेष गाड्या
पश्चिम रेल्वेतर्फे 16 जोडी ट्रेनच्या 376 फेऱ्या उत्तर प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली आणि राजस्थानकरिता, 140 फेऱ्या बिहार, ओडिसा आणि पश्चिम बंगालसाठी चालवण्यात येत आहे. याशिवाय 106 फेऱ्या तेलंगणा आणि कर्नाटककरिता धावत आहे. उधना (सूरत) येथून मोठ्या संख्येने कामगार वर्ग प्रवास करतो. त्यांच्यासाठी 192 फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. तसेच गुजरात राज्यातील अन्य काही स्थानकातून अहमदाबाद, गांधीधाम, वडोदरा, वलसाड, राजकोट, भावनगर टर्मिनसहून विशेष ट्रेन चालविण्यात येत आहे. मुंबईतून देशाच्या विविध भागाकरिता 12 जोडी स्पेशल ट्रेनच्या 148 फेऱ्या चालविण्यात येत आहे.
भारतीय रेल्वे ही भारताची लाईफलाईन
भारतीय रेल्वे ही भारताची लाईफलाईन आहे. कुठेही प्रावस करायचा असेल तर पहिलं प्राधान्य भारतीय रेल्वेला दिलं जातं. कमी पैशात आणि अत्यंत वेगाने प्रवास करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे भारतीय रेल्वे आहे. पण आपल्याला रेल्वेचं तिकीट बुक करायचं असेल किंवा प्लॅटफॉर्म पास खरेदी करायचा असेल, तर त्यासाठीही रेल्वेकडून सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.