छत्रपती संभाजीनगर : ती १० वर्षांची, तर तो दहावीत शिकणारा १५-१६ वर्षांचा…एकाच परिसरात राहतात. तिला पाहून त्याला प्रेमाचे वेड लागले. स्वप्नांच्या दुनियेत वावरत असतानाच त्याने तिला गाठले व तिचा हात पकडून ‘आय लव्ह यू’ म्हटले. हा प्रकार तिने घरी आईला सांगितला. आईने पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करून एम सिडको पोलिसांनी त्याची रवानगी थेट रिमांड होममध्ये केली.
आठवडाभरापासून ‘व्हॅलेंटाइन डे’चा फिवर वाढलेला आहे. आठवडाभरात वेगवेगळे डे साजरे करून प्रेम व्यक्त केले जाते. ब्रिजवाडीतील रमाबाई चौक परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलाविरोधात एम सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याच परिसरात राहणारी १० वर्षांची मुलगी १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी घराजवळील किराणा दुकानात सामान आणण्यासाठी गेली होती.
त्याचवेळी त्याने तिला गाठले व तिचा हात पकडून फिल्मी स्टाईलने ‘आय लव्ह यू’ म्हणत प्रपोज केले. तिने घाबरून त्याला झटका देत हात सोडवला व घरी जाऊन आईला हा प्रकार सांगितला. त्यानंतर तिच्या आईने एम सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दिली.