सौजन्य- Facebook @Yashomati Thakur
अमरावती : अमरावतीच्या काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर आणि नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडे यांच्यासह १५ जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. ठाकूर आणि वानखेडे यांनी खासदार जनसंपर्क कार्यालयाचे कुलूप तोडून ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्याने त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीनंतर खासदार जनसंपर्क कार्यालयाचा ताबा मिळवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे वारंवार पत्रव्यवहार केला. मात्र पत्रव्यवहार करूनदेखील जनसंपर्क कार्यालयाचा ताबा मिळत नसल्याने यशोमती ठाकूर आणि बळवंत वानखडे थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात पोहचले. त्यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची बैठक सुरू होती. त्यांनी थेट बैठकीत प्रवेश करत प्रशासनाला धारेवरच धरले. तरीही खासदार जनसंपर्क कार्यालय ताब्यात देण्यात विरोध सुरू झाला, त्यानंतर यशोमती ठाकूर, बळवंत वानखेडे आणि त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत टाळे तोडून कार्यालय ताब्यात घेतले. यामुळे वातावरण चांगलेच तापले होते.
अमरावतीतील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातच खासदार जनसंपर्क कार्यालय आहे. लोकसभा निवडणुकीपर्यंत हे कार्यालय माजी खासदार नवनीत राणा यांच्याकडे होते. निवडणुकीत राणांचा पराभव झाल्यानंतर वानखेडे यांनी रितसर पत्रव्यवहार करत कार्यालयाचा ताबा मागितला. त्याच काळात राज्यसभेचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी देखील जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून कार्यालयाचा ताबा मागितला. त्यामुळे प्रशासानाने कोणतीही भूमिका न घेता, हे कार्यालय दोन्ही खासदारांना निम्मे निम्मे देण्यावर विचार सुरू झाला.
शनिवारी (22 जून) पालकमंत्री चंद्रकांत पाटील अमरावतीच्या दौऱ्यावर आले. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांची बैठक सुरू असताना यशोमती ठाकूर, खासदार बळवंत वानखडे, माजी महापौर विलास इंगोले यांच्यासह काही कार्यकर्ते कार्यालयात पोहोचले आणि घोषणाबाजी करत त्यांनी कुलूपबंद असलेल्या जनसंपर्क कार्यालयाच्या चाव्या मागितल्या.
पण चाव्या मिळत नसल्याचे पाहून यशोमती ठाकूर आणि काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि कार्यकर्त्यांनी कार्यालयाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. यावेळी पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी केलेले बॅरिकेटिंग तोडून ही मंडळी दारापर्यंत पोहचले आणि त्यांनी कुलूप तोडून कार्यालयाचा ताबा घेतला.