पाटस : पाटस ते दौंड अष्टविनायक रस्त्यावर शुक्रवारी मालवाहतूक करणाऱ्या पिकअप जीप गाडीने एका शालेय विद्यार्थ्याला उडवले. या मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी पुन्हा या रस्त्यावर पाटस जवळील गोलांडी मळा – साळुंखे वस्तीजवळ चार वाहनांचा विचित्र अपघात घडल्याची घटना घडली. या अपघातात मारुती सुझुकी या चारचाकीचा चालक किरकोळ जखमी झाला असून, तीन वाहनांचे मात्र नुकसान झाले आहे.
पाटस ते दौंड रस्त्यावर भरधाव वेगाने जाणाऱ्या मालवाहतूक टेम्पोने समोर जात असलेल्या मारुती सुझुकी कंपनीच्या कारला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने ती कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाझुडपात पलटी झाली. कारला धडक देऊन टेम्पोचालक भरधाव वेगाने दौंडच्या दिशेने जात असताना गोलांडी मळा येथील शाळेकडे जात असलेल्या हुंदाई कंपनीच्या कार गाडीला जोरात धडक दिली. तर दौंडवरून पाटस कडे येणाऱ्या समोरील महिंद्रा कंपनीच्या स्कार्पिओ गाडीला धडक दिली. रस्त्यावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या मालवाहतूक टेम्पोने समोरील तीन वाहनांना जोरदार धडक दिली. शनिवारी (दि. २९) सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच पाटस पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. या अपघातामुळे काही क्षणात या रस्त्यावर दोन्ही बाजूला वाहतुकीची कोंडी झाली होती.
पाटस पोलिसांनी अपघातग्रस्त वाहनांना रस्त्यावरुन बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली. मारुती सुझुकी कारचे वाहन चालक दत्तात्रय भगवान ओमासे (रा.कळस ता. इंदापूर जि पुणे) यांनी पाटस पोलीस चौकीत टेम्पो चालकाविरोधात तक्रार दिल्याने टेम्पो चालक अमोल जगन्नाथ आल्हाट (रा.घोडेगाव, ता.नेवासा, जि नगर) हा मद्यपान करून वाहन चालवत असल्याचे निदर्शनास आल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करुन ताब्यात घेतले. अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख यांनी दिली.