जिवंत वृद्ध व्यक्तीची मृत म्हणून केली नोंद
अमरावती : ‘मी जिवंत आहे, मेलो नाही…’ अशी वेदनादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच प्रशासनाला जाग आली. तसेच जिवंत व्यक्तीला मृत दाखवल्याचा प्रकार मोर्शी तालुक्यातील लेहगाव ग्रामपंचायतीत घडला. या गंभीर प्रकरणात अमरावती जिल्हा परिषदेच्या सीईओ संजिता मोहपात्रा यांनी लक्ष घालत संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरले असून, तत्काळ दुरुस्तीचे निर्देश दिले आहेत.
लेहगाव येथील रहिवासी नारायण जेवडे यांची मृत्यूची नोंद चुकीने करण्यात आली. विशेष म्हणजे जेवडे हे २०१५ मध्ये जिल्हा परिषद अमरावतीमधून चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सेवानिवृत्त झाले. ते आजही हयात आहेत. २०१०-११ च्या कर आकारणी रजिस्टरमध्ये (नमुना ८) मालमत्ता क्रमांक १९० वर ‘मयत’ असे लिहून जेवडे यांची मालमत्ता त्यांच्या भावाची पत्नी प्रभा सुभाष जेवडे यांच्या नावे करण्यात आली. मात्र, ही नोंद कोणत्या आधारावर झाली, याचा कोणताही दस्तावेज उपलब्ध नसल्याचे ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
वृद्धाने घेतली प्रशासनाकडे धाव
नारायण जेवडे गेल्या अनेक वर्षांपासून या चुकीच्या नोंदीसंबंधी लेहगाव ग्रामपंचायत, मोर्शी गटविकास अधिकारी आणि शिरखेड पोलिस ठाण्याच्या दरवाज्यावर आपली व्यथा मांडत होते. मात्र, कोणीही त्यांच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली नाही.
उशिरा का होईना प्रशासन जागरूक
सोशल मीडियावर जेवडे यांच्या मृत्यूचे वृत्त पसरताच जिल्हा परिषदेच्या सीईओ मोहपात्रा यांनी तत्काळ मोर्शी गटविकास अधिकाऱ्यांकडून अहवाल मागितला. त्यानंतर सहाय्यक गटविकास अधिकारी प्रीती खटिंग यांनी ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण राऊत यांच्याकडून चौकशी केली आणि वस्तुस्थितीचा अहवाल सादर केला.
हलगर्जीपणाचा गाठला कळस
जिल्हा परिषदेने या चुकीची तत्काळ दुरुस्ती करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे नारायण जेवडे यांच्यावर आलेले मानसिक संकट काही अंशी दूर होण्याची शक्यता आहे. मात्र, ही घटना प्रशासनाच्या नोंदणी प्रणालीतील गोंधळाचे आणि हलगर्जीपणाचे उदाहरण आहे.