
Mangal Prabhat Lodha: मंत्री लोढांच्या पुढाकाराने सुटला बाणगंगेच्या आरतीचा तिढा; त्रिपुरी पौर्णिमेला आरतीसह...
त्रिपुरी पौर्णिमेला होणार भव्य आरती
मंगलप्रभात लोढा यांच्या पुढाकाराने सुटला तिढा
वाहतूक नियंत्रणाच्या अडचणीमुळे परवानगी नाकारली
मुंबई: मुंबईतील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या वाळकेश्वर येथील बाणगंगेवर आता त्रिपुरी पौर्णिमेला आरती सह धार्मिक कार्यक्रम करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या पुढाकाराने हा तिढा सुटला असून यासंदर्भात पोलीस उपायुक्त अनिल कुंभारे यांच्यासह बाणगंगा ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त महाले यांच्यासह ट्रस्टचे अन्य पदाधिकारी आणि स्थानिक निवासी यांच्या बैठकीनंतर आरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. दक्षिण मुंबईत होत असलेल्या वाहतूक नियंत्रणाच्या अडचणीमुळे या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र बैठकीतल्या चर्चे नंतर पोलीस प्रशासनाने येत्या ७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या त्रिपुरी पौर्णिमेच्या आरतीला परवानगी दिलेली आहे.
गेल्या काही वर्षांपासून बाणगंगावर होणाऱ्या महाआरतीला मुंबईकरांसह राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने येत असतात. त्यामुळे गर्दी वाढते, असे कारण पोलिसांनी दिल्याचे ट्रस्टचे पदाधिकारी सांगतात. यासंदर्भातील परवानगी नाकारल्याचे पत्र ३ ऑक्टोबर रोजी ट्रस्टला देण्यात आले होते.
मुंबईतील पवित्र बाणगंगा तीर्थक्षेत्रावर त्रिपुरी पौर्णिमेच्या मुहूर्तावर दरवर्षी गौड सारस्वत ब्राह्मण (जीएसबी) टेंपल ट्रस्टतर्फे बाणगंगा महाआरतीचे आयोजन केले जाते. यंदाही ५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या महाआरतीची परंपरा अखंड रहावी, यासाठी आज मुंबई वाहतूक पोलीस विभागाचे सहआयुक्त… pic.twitter.com/DAIuGM10zO — Mangal Prabhat Lodha (@MPLodha) October 29, 2025
या पार्श्वभूमीवर मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत मंत्री लोढा यांनी जनतेच्या भावनांचा आदर करून प्रशासनाने आरती कार्यक्रमात उपाययोजना कराव्यात, धार्मिक कार्यक्रमात मोठ्या संख्येने भाविक जमा होत असले तरी प्रशासन जनतेच्या भावनांचा अनादर करू शकत नसल्याचे लोढा यांनी म्हटले आहेत.
तर ही महाआरती केवळ वर्षातून एकदाच, तेही संध्याकाळी होते. यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात. या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुंबई पोलिसांकडे सक्षम व्यवस्था असल्याचेही ट्रस्टच्या वतीने बैठकीत सांगण्यात आले. तसेच यावर्षीच्या जीएसबी टेंपल ट्रस्टला राज्य सरकारच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाने ही २४ ऑक्टोबर रोजी पारंपरिक पूजेची परवानगी दिली असल्याचेही ट्रस्टने मुंबई पोलिसांच्या निदर्शनाला आणून दिले. या आरतीमध्ये हजारो दिवे लावले जातात आणि हा विधी वाराणसीच्या गंगा आरतीसारखा अतिशय भव्य असतो. आता या धार्मिक उत्सवाला परवानगी मिळाल्याने सारस्वत गौड ब्राह्मण ट्रस्ट ने मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे आभार व्यक्त केले आहेत.