
'चुकीचे निदान, चुकीची औषधे अन्...'; जसलोक हॉस्पिटलने केले 'या' प्रकरणाचे यशस्वी निराकरण
योग्य वेळी सेकंड ओपिनियनने वाचवले आयुष्य
जसलोक हॉस्पिटलने अधोरेखित केले अचूक निदानाचे महत्त्व
न्युरोफिजिओलॉजिकल तपासण्यांमुळे आधीचे निदान चुकीचे ठरले
मुंबई: जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने पॉझिटिव्ह अँटिबॉडी चाचणीच्या आधारे मायस्थेनिया ग्रेव्हिसचे निदान करण्यात आलेल्या आणि दीर्घकालीन औषधोपचार सुरू असलेल्या ३५ वर्षीय परिचारिकेच्या एका गुंतागुंतीच्या न्युरोलॉजिकल प्रकरणाचे यशस्वी निराकरण केले. तज्ज्ञांकडून करण्यात आलेल्या सखोल पुनर्मूल्यांकनासह प्रगत न्युरोफिजिओलॉजिकल तपासण्यांमुळे आधीचे निदान चुकीचे ठरले आणि रुग्णाला अनावश्यक व संभाव्यतः धोकादायक इम्युनोसप्रेसिव्ह थेरपीपासून सुरक्षित वाचवता आले.
नवी मुंबईतील या रुग्णाची डावी पापणी गेल्या अनेक महिन्यांपासून झुकलेल्या (प्टोसिस) अवस्थेत होती. यापूर्वी हायपरथायरॉइडिझमचे निदान झाल्यामुळे त्यांच्या गर्भधारणेच्या नियोजनात आधीच अडचणी निर्माण झाल्या होत्या. सुरुवातीला त्यांनी न्युरो-ऑप्थॅल्मोलॉजिस्ट आणि त्यानंतर मुंबईतील एका आरोग्य संस्थेतील न्युरोलॉजिस्ट यांचा सल्ला घेतला. अॅसिटाइलकोलीन रिसेप्टर (AChR) अँटिबॉडीसाठी करण्यात आलेली रक्ततपासणी पॉझिटिव्ह आल्याने मायस्थेनिया ग्रेव्हिसचे निदान करण्यात आले आणि त्यानुसार स्टेरॉइड्स व पायरिडोस्टिग्माइन यांसारखी औषधे सुरू करण्यात आली. या औषधांचे दीर्घकालीन सेवन, विशेषतः तरुण महिलांमध्ये, गंभीर दुष्परिणाम निर्माण करू शकते.
Health News: जसलोक हॉस्पिटलमध्ये अति-लठ्ठ महिलेवर यशस्वी सर्जरी; पहिल्यांदाच एंडोस्कोपिक स्पाइन…
आधीच हायपरथायरॉइडिझममुळे शारीरिक व मानसिक ताण सहन करत असलेल्या या रुग्ण महिलेला मायस्थेनिया ग्रेव्हिससाठी आयुष्यभर इम्युनोसप्रेसिव्ह थेरपी घ्यावी लागू शकते, हे समजल्यावर तिची चिंता अधिक वाढली. एका जवळच्या मैत्रिणीच्या सल्ल्याने त्यांनी सेकंड ओपिनियनसाठी जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर गाठले, जिथे त्यांनी कन्सल्टन्ट न्युरोलॉजी व न्युरोमस्क्युलर डिसऑर्डर तज्ज्ञ डॉ. विनया भंडारी यांचा सल्ला घेतला.
जसलोक हॉस्पिटलमध्ये रुग्णाचे सखोल आणि सर्वांगीण पुनर्मूल्यांकन करण्यात आले. ब्रेन एमआरआयद्वारे प्टोसिसमागे सेंट्रल नर्व्हस सिस्टीमशी संबंधित कोणताही आजार नाही, हे स्पष्ट झाले. त्यानंतर रिपिटेटिव्ह नर्व्ह स्टिम्युलेशन तसेच मायस्थेनिया ग्रेव्हिससाठी सर्वाधिक संवेदनक्षम मानली जाणारी सिंगल-फायबर इलेक्ट्रोमायोग्राफी ही प्रगत तपासणी करण्यात आली. या दोन्ही चाचण्यांचे निष्कर्ष पूर्णतः सामान्य आढळले.
याबाबत माहिती देताना डॉ. विनया भंडारी म्हणाल्या, “प्टोसिस, दुहेरी दिसणे, गिळताना किंवा बोलताना अडचण येणे, आवाजात बदल तसेच सहज थकवा येणे अशा लक्षणांसह येणाऱ्या रुग्णांमध्ये मायस्थेनिया ग्रेव्हिसचे निदान करण्यासाठी सिंगल-फायबर ईएमजी ही उपलब्ध चाचण्यांपैकी सर्वाधिक संवेदनक्षम तपासणी आहे. चिकित्सात्मकदृष्ट्या प्रभावित स्नायूचा सिंगल-फायबर इलेक्ट्रोमायोग्राफी अहवाल जर सामान्य आला, तर मायस्थेनिया ग्रेव्हिसची शक्यता जवळजवळ पूर्णपणे नाकारली जाते.”
या निष्कर्षांच्या आधारे रुग्णाची मायस्थेनियासाठी सुरू असलेली सर्व औषधे तात्काळ बंद करण्यात आली. पुढील तपशीलवार वैद्यकीय इतिहासातून असे निदर्शनास आले की सतत खाज येत असल्यामुळे रुग्ण वारंवार डावी पापणी चोळत होती. यामुळे ट्रॉमॅटिक एपोन्युरोटिक प्टोसिस ही यांत्रिक स्वरूपाची पापणीची स्थिती निर्माण झाली होती, ज्याचा मज्जातंतू किंवा स्नायूंच्या कोणत्याही आजाराशी संबंध नाही.
तज्ज्ञांनी हेही स्पष्ट केले की अॅसिटाइलकोलीन रिसेप्टर अँटिबॉडीजचा मायस्थेनिया ग्रेव्हिसशी निकटचा संबंध असला, तरी थायरॉइड विकारांसारख्या इतर ऑटोइम्युन स्थिती असलेल्या रुग्णांमध्ये या चाचणीचे फॉल्स-पॉझिटिव्ह निकाल येण्याची शक्यता असते. त्यामुळे केवळ अँटिबॉडी चाचणीच्या आधारावर दीर्घकालीन उपचार सुरू करणे योग्य ठरत नाही. जिथे निदानाबाबत शंका असेल, तिथे इम्युनोसप्रेसिव्ह थेरपी सुरू करण्यापूर्वी रिपिटेटिव्ह नर्व्ह स्टिम्युलेशन आणि/किंवा सिंगल-फायबर ईएमजीद्वारे इलेक्ट्रोफिजिओलॉजिकल पातळीवर खात्री करणे अत्यावश्यक आहे.
Jaslok Hospital : मेंदूची गंभीर दुखापत झालेल्या ४ वर्षीय चिमुरड्याला मिळाले जीवनदान
या प्रकरणाचा सारांश देताना डॉ. विनया भंडारी पुढे म्हणाल्या, “पॉझिटिव्ह अॅसिटाइलकोलीन रिसेप्टर अँटिबॉडी चाचणी मायस्थेनिया ग्रेव्हिसच्या निदानात उपयुक्त असली, तरी ती स्वतंत्रपणे निर्णायक मानता येत नाही. रुग्णाची लक्षणे, क्लिनिकल निरीक्षणे आणि वस्तुनिष्ठ न्युरोफिजिओलॉजिकल पुरावे यांचा परस्पर ताळमेळ साधूनच निदान निश्चित केले पाहिजे. निदान अनिश्चित असल्यास, इम्युनोसप्रेसिव्ह थेरपी सुरू करण्यापूर्वी रिपिटेटिव्ह नर्व्ह स्टिम्युलेशन व विशेषतः सिंगल-फायबर ईएमजीसारख्या चाचण्या करणे अत्यंत आवश्यक आहे.”
यासंदर्भात जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे चीफ मेडिकल ऑफिसर डॉ. मिलिंद खडके यांनी सांगितले, “हा केस पुराव्यांवर आधारित निदान आणि बहुविद्याशाखीय मूल्यमापनाचे महत्त्व अधोरेखित करतो. जसलोक हॉस्पिटलमध्ये आमचा भर केवळ आजाराच्या उपचारांवर नाही, तर रुग्णांना त्यांच्या जीवनमानाच्या दर्जावर, दीर्घकालीन आरोग्यावर आणि गर्भधारणेसारख्या वैयक्तिक उद्दिष्टांवर परिणाम करू शकणाऱ्या अनावश्यक थेरपींपासून संरक्षण देण्यावरही आहे.”
ही केस चिकित्सक आणि रुग्ण दोघांसाठीही एक महत्त्वाचा संदेश देते—कोणत्याही रुग्णावर दीर्घकालीन न्युरोलॉजिकल आजाराचे निदान लावण्याआधी आणि आयुष्यभराचे उपचार सुरू करण्याआधी, प्रगत न्युरोफिजिओलॉजिकल तपासण्यांच्या आधारावर अचूक आणि सुस्पष्ट निदान करणे अत्यावश्यक आहे.