Accident
मंगळवेढा : ऊस भरून ब्रम्हपुरी-मंगळवेढा या राष्ट्रीय महामार्गावरून युटोपियन कारखान्याकडे निघालेल्या ट्रॅक्टरला भरधाव वेगात आलेल्या आयशर टेम्पोची जोरदार धडक बसली. या ट्रॅक्टरला पाठीमागून धडक दिल्याने ट्रॅक्टर पलटी झाला. यामध्ये ट्रॅक्टरचालक अजिनाथ अशोक शिंदे (वय 34 रा. पिंपळेची वाडी जि.बीड) हा गंभीररित्या जखमी झाला. गंभीर जखमी झालेला ट्रॅक्टरचालकाचा नंतर मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात आयशर टेम्पोचालकाविरूध्द गुन्हा दाखल झाला.
हेदेखील वाचा : GST Rate : सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी! सिगारेट, तंबाखू, शीतपेये महागणार; GST मध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव
एक डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला. हा ट्रॅक्टर दोन ट्रॉलीमध्ये ऊस भरून ब्रम्हपुरीकडून राष्ट्रीय महामार्गावरून मंगळवेढ्याकडे येत असताना आयशर टेम्पोच्या चालकाने भरधाव वेगात गाडी वेडीवाकडी चालवून रोडच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केले. ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरला पाठीमागून जोराची धडक दिल्याने ट्रॅक्टर पलटी झाला. या अपघातात ट्रॅक्टरचालक गंभीर जखमी झाला होता. पण नंतर त्याचा मृत्यू झाला. तसेच दोन्ही वाहनाच्या नुकसानीस कारणीभूत ठरला असून आयशर टेम्पोचालक अपघाताची खबर न देता घटनास्थळावरून फरार झाल्याचे हरीराम थोरवे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, सध्या जिल्ह्यात ऊस गाळप हंगाम सुरु असल्याने ऊसाची भरलेली वाहने रोडने जात असल्याचे चित्र आहे. प्रत्येक ट्रॅक्टरला ओळखू येण्यासाठी रिफ्लेक्टर लावणे गरजेचे आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी अपघात टाळण्यासाठी ज्या वाहनांना रिफ्लेक्टर नाहीत, त्यांच्यावर कारवाई करून होणारे अपघात टाळावेत, अशी मागणी होत आहे.
…म्हणून ट्रॅक्टर चालवताना येत नाही आवाज
ट्रॅक्टर चालवताना चालक टेप रेकॉर्ड लावून आवाज मोठा करतात. त्यामुळे पाठीमागून येणार्या वाहनचालकाने हॉर्न वाजवूनही संबंधित ट्रॅक्टरचालकांना आवाज न आल्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ट्रॅक्टरमध्ये टेप लावणार्या चालकावरही कारवाईची मागणी होत आहे. ट्रॅक्टरला डबल ट्रेलर असल्यामुळे अशी वाहने सुसाट वेगाने रस्त्याने धावतानाचे चित्र असून, मर्यादित वेग ठेवून वाहने चालविल्यास अपघातापासून बचाव होणार असल्याचे म्हटले जात आहे.
हेदेखील वाचा : वर्षभरात 10 हजाराचे झाले 1 कोटी रुपये; 3 रुपयांवरून 2 लाख 36 हजारांपर्यंत पोहचली शेअरची किंमत!