पडवी येथे हायवाने दुचाकी स्वाराला चिरडले
वरवंड : दौंड तालुक्यातील शिरूर सुपा-अष्टविनायक महामार्गावर भीषण अपघात झाला. पडवी फाट्यावर खडी वाहतूक करणाऱ्या हायवाने दुचाकीवरून जाणाऱ्या पती-पत्नीला हायवाने मागील चाकाखाली चिरडले. यामध्ये पती कबाजी भीमाजी कोळपे (वय ५५) यांचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी अलका कबाजी कोळपे या खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे.
कबाजी भीमाजी कोळपे (वय ५५) व त्यांची पत्नी अलका कबाजी हे हिरो कंपनीच्या (एमएच ११ सीटी ५७०९) या दुचाकीवरून सोमजाई वाईनगर (जि.सातारा) येथून अष्टविनायक महामार्गावरून प्रवास करत होते. दरम्यान, पडवी फाट्यावर दुचाकी आली असता, ओव्हरलोड खडीने भरलेला हायवा (एमएच ४२ टी ११२८) थेट दुचाकीवरून गेली.
अष्टविनायक मार्गाच्या डाव्या व उजव्या बाजूस डोंगर भाग आहे. या भागात दगडी खाणीचे प्रमाण मोठे आहे. या खाणीकडून हायवा भरून येत असतात. अष्टविनायक मार्गावर थेट चढत असल्याने वारंवार किरकोळ स्वरूपाचे अपघात होत असतात. या सर्व प्रकाराकडे गाव, वनविभाग आणि महसूल विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे स्थानिक नागरिकांकडून बोलले जात आहे
येथील खाणींतील खडी, डस्ट, वाहतूक करणारे हायवा चालक हे अवजड वाहने चालविण्यासाठी अनुभवी नाहीत. तर काही वेळा मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवित असल्याचे नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. या हायवा चालकांनी वाहतुकीचे सर्वच नियम धाब्यावर बसवून सर्वसामान्य नागरिकांचे जीव धोक्यात घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याकडे परिवहन विभागाचे अधिकारी का गप्प आहेत? हा प्रश्न वारंवार सतावत आहे.
तहसीलदारांशी संपर्क नाही
या घटनेबाबत दौंडचे तहसीलदार अरूण शेलार यांना पत्रकारांनी मोबाईलवरून संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. यापूर्वीही निवडणूक काळात तहसीलदार अरुण शेलार यांना पत्रकारांनी फोन केला होता. तेव्हाही जाणीवपूर्वक फोन उचलण्यास टाळाटाळ केली आहे. अशा अधिकाऱ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी गांभिर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
ग्रामपंचायतीने वाहतुकीची पर्यायी व्यवस्था करावी
हे खडी क्रशर सुरू करण्यासाठी ज्या ग्रामपंचायत समितीने परवानगी दिली आहे, त्यांनी या वाहनांच्या वाहतुकीसाठी रस्त्याची सोय करून द्यावी. तसेच पडवी फाट्यावर दोन्ही बाजूला गतिरोधक करून देण्यात यावेत. या परिसरातील रस्त्यांची तांत्रिकदृष्ट्या पाहणी करण्यात यावी. हायवा वाहनांवर असलेले अल्पवयीन तसेच मद्यपान करणारे चालक यांच्यामुळे दमदाटी, मारहाण होण्याचे प्रमाण वाढत आहे. यावर पोलीस व महामार्ग पोलीस यांनी संयुक्त कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रसचे सरचिटणीस अजित शितोळे यांनी केली.