
ट्रॅक्टरच्या धडकेत महिलेचा मृत्यू; संतप्त ग्रामस्थांचा अष्टविनायक मार्गावर रास्ता रोको
मिळालेल्या माहितीनुसार, १ जानेवारी रोजी पहाटे ६:३० च्या सुमारास धनगरवाडी येथील कृषीनिष्ठ शेतकरी नामदेव शंकर शेळके यांच्या पत्नी आशाताई शेळके या ओझर अष्टविनायक रोडवर मॉर्निंग वॉक करत होत्या. यावेळी मागून येणाऱ्या ऊस वाहतूक ट्रॅक्टरने त्यांना जोरदार धडक दिली. यात आशाताई यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच त्यांच्यासोबत असलेल्या दुसऱ्या एका महिलेलाही किरकोळ दुखापत झाली असून, त्यांच्यावर नारायणगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत आशाताई शेळके यांच्या पश्चात पती, मुलगी श्वेता (आर.टी.ओ. पोलीस अधिकारी, रायगड) आणि मुलगा सत्यवान (शासकीय सेवा, रायगड) असा परिवार आहे.
अष्टविनायक रोडवर दिशादर्शक फलक नसणे, साईड पट्ट्यांचा अभाव आणि गतिरोधक (स्पीडब्रेकर) नसल्यामुळे हे रस्ते ‘डेथ ट्रॅप’ बनले आहेत. विशेषतः ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना इंडिकेटर, नंबर प्लेट आणि रिफ्लेक्टर नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या ३-४ महिन्यांत या भागात ३ ते ४ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या वाढत्या अपघातांमुळे धनगरवाडी ग्रामस्थ आणि तरुण वर्गाचा संयम सुटला आणि त्यांनी धनगरवाडी-कारखाना फाटा येथे तीव्र रास्ता रोको आंदोलन केले.
तासभर मार्गावरील वाहतूक ठप्प
नवीन वर्ष आणि सुट्टीचा दिवस असल्याने शिवनेरी, लेण्याद्री आणि ओझर येथे दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटकांची मोठी गर्दी होती. आंदोलनामुळे जवळपास तासभर या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पी.डब्ल्यू.डी.चे मुख्य अधिकारी वाबळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. अष्टविनायक रोडच्या संदर्भातील सर्व मागण्या येत्या २-४ दिवसांत पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.
आंदोलनात विघ्नहरचे चेअरमन सत्यशील शेरकर, राष्ट्रवादीचे नेते सुरज वाजगे, शेतकरी संघटनेचे तानाजी बेनके, राजेंद्र ढोमसे, प्रियंका शेळके, विलास शेळके, इंद्रजीत शेळके आदी उपस्थित होते. नारायणगावचे पोलीस उपनिरीक्षक जगदीश पाटील व त्यांच्या पथकाने परिस्थितीवर नियंत्रण ठेवले. दरम्यान प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता वेळेत न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.