Accommodation facilities for Warkaris in Pune city for Ashadhi Wari 2025
पुणे – शहर प्रतिनिधी : राज्याला आषाढी वारीचे वेध लागले आहेत. दोन दिवसांमध्ये पुण्यामध्ये संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचे आगमन होणार आहे. पुणे शहरात पालखीचे आगमन येत्या गुरुवारी (दि.20) होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजे 21 जून रोजी दोन्ही पालख्यांचे पुण्यामध्ये मुक्काम असणार आहे. यावेळी हजारो वारकरी हे शहरामध्ये दाखल होत असतात. या सर्व वारकऱ्यांच्या निवासाची तयारी पूर्ण झाली आहे.
पुणे शहर आषाढी वारीसाठी तयार होत आहे. वारकऱ्यांच्या स्वागतासाठी प्रशासन आणि पोलिसांकडून योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर पावसाचा जोर लक्षात घेता निवासाची सोय करण्यात आली आहे. त्याचबरोबर महिलांसाठी स्वतंत्र निवासस्थाने तसेच त्याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे. याचबरोबर स्वच्छता आणि आरोग्याच्या दृष्टीने निर्जंतुकीकरणाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती निवडुंग्या विठोबा मंदिराचे विश्वस्त आनंद पाध्ये यांनी दिली.
वारीच्या पार्श्वभूमीवर २० जून रोजी पालख्या शहरात दाखल होणार असून, त्या अनुषंगाने शहरातील शाळा, महाविद्यालये, मंदिर परिसर, सार्वजनिक सभागृहे, तसेच सामाजिक संस्था यामध्ये वारकऱ्यांच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे.
विशेषतः महिला वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी नियोजन अधिक काटेकोर करण्यात आले आहे. निवासस्थानी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून, महिला स्वयंसेविकांची नियुक्तीही करण्यात आली आहे. प्रत्येक निवासस्थळी आरोग्यविषयक स्वच्छता राखून निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
याशिवाय, महापालिकेच्या आरोग्य विभागाने प्रत्येक मुक्काम स्थळी प्राथमिक उपचारासाठी वैद्यकीय पथक तैनात केले आहे. कोणताही संसर्ग पसरू नये यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे.
पुणे मर्चंट चेंबरचे संचालक विजय मुथा यांनी सांगितले की, “या वर्षी मार्केट यार्डमध्ये सुमारे १५,००० पेक्षा अधिक वारकऱ्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. व्यापाऱ्यांकडून पाण्याची सोय, विद्युत व्यवस्था आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. पालख्या पुण्यात दाखल झाल्यानंतर व्यापार मंडळ आणि बाजार समितीच्या वतीने छत्र्या, औषधपेट्या, रेनकोट तसेच अन्नपदार्थ ठेवण्यासाठी आवश्यक वस्तूंचे वाटप वारकऱ्यांना करण्यात येते. लायन्स क्लबच्या वतीने पाण्याचा टँकर वारीसोबत दिला जातो, तर चालक ट्रेडिंग या संस्थेच्या वतीने एक रुग्णवाहिका आणि पंधरा ते सोळा डॉक्टरांची टीम वारीसोबत असते.”
सारसबाग विश्वस्त प्रवीण चोरबेले यांनी सांगितले की, “२१ जून रोजी श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे. याचबरोबर मार्केटयार्ड परिसरात २०० हून अधिक दिंड्या मुक्कामी राहणार आहेत. मार्केटयार्डातील मोठ्या गोडाऊनमध्ये निवासासाठी पुरेशी जागा आणि सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत.”
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुणे मर्चंट चेंबरचे कमिटी अध्यक्ष उत्तम भाटिया यांनी सांगितले की, “मार्केटयार्ड परिसरात वारीच्या स्वागतासाठी विद्युत रोषणाई, मंडप, महाप्रसाद यांसारख्या सर्व सुविधा सज्ज आहेत. २१ जूनच्या महाप्रसादाची पूर्वतयारी देखील पूर्ण झाली आहे.”
शहरातील अनेक सामाजिक संस्थांनीही पुढाकार घेत वारकऱ्यांच्या सेवेसाठी मोफत अन्नदान, चहा-पाण्याची सोय, आरोग्य तपासणी शिबिरे आणि औषध वितरणाचे उपक्रम राबवले आहेत. पुणे शहर संपूर्णतः वारीच्या स्वागतासाठी सज्ज असून, रस्त्यांवर रांगोळ्या, तोरणं, फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.