वाई : राष्ट्रीय महामार्गावर भुईंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोपेगाव, ता. वाई येथील हॉटेल कोहिनूर येथे ट्रॅव्हल्स बसमधून एका व्यापाऱ्याची २२ लाख रुपयांची रोकड असलेली बॅग चोरुन नेणाऱ्या मध्यप्रदेशातील चोरट्याला जेरबंद करण्याची कामगिरी भुईंज पोलीस व सातारा स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्तपणे केली असून या चोरीतील १८ लाख रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात यश मिळवले आहे. रज्जब हसन खान, (वय ४१, रा. सिंधीमोहल्ला, धरमपुरी, जि. धार, राज्य मध्यप्रदेश) असे याप्रकरणी अटक केलेल्या चोरट्याचे नाव असून त्याला न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २६ सप्टेंबर रोजी या घटनेतील फिर्यादी नरेंद्र प्रल्हादसिंग गिरासे (वय ४२, रा. भैरवनाथनगर, धानुरी रोड, विश्रांतवाडी, पुणे) हे एका खासगी ट्रॅव्हल बसमधून प्रवास करत होते. सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ही बस बोपेगाव येथील हॉटेलवर थांबली असताना ते नाष्टा करण्यासाठी खाली उतरले होते. नेमके याच दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांची मशिनरी विक्रीतून आलेली २२ लाख रुपयांची रोख रक्कम असलेली बॅग चोरुन नेली होती. याबाबत भुईंज पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दाखल केली होती. या गुन्ह्यातील आरोपींना पकडण्याबाबत वरिष्ठांनी सूचना केल्या होत्या. मात्र, गुन्हयातील आरोपी हे अज्ञात असल्याने त्यांना निष्पन्न करण्याचे मोठे आव्हान पोलीसांसमोर होते. त्यासाठी भुईंज पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे स्वतंत्र पथक तपास करत असतानाच स्थानिक गुन्हे शाखेची टीम देखील या गुन्हयाचा समांतर तपास करीत होती.
सीसीटीव्ही फुटेजमधून काढला आरोपीचा माग
तपास पथकाने गुन्हयाच्या तपासात घटनास्थळाचे परिसरातील, सातारा-पुणे हायवे रोडवरील तसेच आरोपींच्या गुन्हा करुन पळुन जाण्याच्या मार्गावरील जवळपास १०० पेक्षा जास्त ठिकाणचे सी.सी.टी.व्ही फुटेजेस तपासून आरोपी निष्पन्न केले. सदरचे आरोपी हे मध्यप्रदेश राज्यातील धरमपुरी, जि. धार येथील असल्याने पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल व वाईचे पोलीस उपअधीपक बाळासाहेब भालचीम, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखा, भुईंज तसेच स्थानिक गुन्हे शाखा, सातारा कडील तपास पथकाने ८ आक्टोबर २०२३ रोजी गुन्हयातील आरोपी नामे रज्जब हसन खान याला धरमपुरी, मध्यप्रदेश जावून ताब्यात घेतले.
चोरीतील १८ लाखाची रक्कम हस्तगत
त्यास भुईंज पोलीस स्टेशन यथे आणुन गुन्हयात अटक करुन प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, वाई यांच्या समोर हजर केले असता ३ दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजुर केली. पोलीस कोठडी रिमांडचे मुदतीत आरोपीकडे सखोल तपास करुन चोरीस गेलेल्या रकमेपैकी 18 लाख रुपये रोख रक्कम जप्त करण्यात पोलीसांना यश प्राप्त झाले आहे. केवळ तांत्रिक तपासाच्या आधारे परराज्यातील आरोपीला शोधून त्याच्याकडे कौशल्यपुर्ण तपास करुन रोख रक्कम 18 लाख रुपये हस्तगत करण्याची उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
या कारवाईत पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल, वाईचे पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब भालचीम पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली भुईंज पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पोलीस उप-निरीक्षक विशाल भंडारे, पोलीस अंमलदार शरद बेबले, प्रविण फडतरे, अविनाश चव्हाण, गणेश कापरे, रोहित निकम, विशाल पवार, सचिन ससाणे, नितीन जाधव, रविराज वर्णेकर, सोमनाथ बल्लाळ, सागर मोहिते, किरण निंबाळकर यांनी या कारवाईत सहभाग घेतला.