शिंदेंच्या दोन मंत्र्यांसह ८ जणांना परत यायंच होतं; त्या दिवशी मातोश्रीवर नक्की काय घडलं?
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला गती आली असताना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदेंच्या शिवसेनेतील मंत्र्यांबाबत मोठा दावा केला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी गेल्या आठवड्यात उमेदवारी अर्ज भरले जात होते. त्यावेळी शिवसेना एकनाथ शिंदे गटातील आठ जणांनी परत येण्याची इच्छा व्यक्त केली होती. यामध्ये त्यांचे दोन वरिष्ठ मंत्री देखील होते. त्यांना परत यायचं होतं. त्यांना आमच्या पक्षाकडून निवडणूक लढवायची होती, असा दावा आदित्य ठाकरे यांनी दी लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.
हेही वाचा-Nagpur: “मतांसाठी काँग्रेसला जातीचं राजकारण फक्त करता येतं”, परिणय फुके यांची सणसणीत टीका
आदित्य ठाकरेंनी सांगितलं की, ते आम्हाला म्हणाले, तुम्ही उद्धव ठाकरेंना विचारा, आम्ही इथेच बंडाची घोषणा करतो, मोठं बंड करू, मग माफी मागू आणि त्यानंतर पक्षात परत येऊ, अशी त्यांनी योजना बनवली होती. मात्र, आम्ही त्यांना नकार कळवला. नारायण राणे यांना ओळखण्यात आमचा पक्ष व वरिष्ठांची चूक झाली. तशीच चूक या ४० जणांच्या बाबतीतही घडली. आजच्या घडीला तिकडच्या काहींना परत येण्याची इच्छा आहे. पण परत येण्याचा विचार सोडून द्या असं स्पष्टपणे आम्ही त्यांना सांगितलं आहे, असंही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
तुम्ही आमच्यात होतात, आमच्याबरोबर असताना आमच्यासाठी ठीक होतात, आता तुम्ही त्यांच्याबरोबर गेला आहात, आम्ही तुमचं चारित्र्य पाहिलं आहे. आता तुम्ही ज्या मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा विचार करत आहात, त्या मतदारसंघात आम्ही जिंकू किंवा हरू, आम्हाला त्याची पर्वा नाही. तरीही आम्ही तुम्हाला परत घेऊ शकत नाही. भले आम्ही त्या मतदारसंघांमध्ये पराभूत झालो तरी चालेल, तरी आम्ही तुम्हाला परत घेणार नसल्याचं आदित्य ठाकरेंनी ठणकावून सांगितलं.
हेही वाचा-Samarjit Ghatge: समरजीत घाटगेंसाठी कोल्हापूरकर मैदानात; ‘या’ संघटनांनी दिला जाहीर पाठिंबा
या लोकांबद्दल आणि नारायण, मनसेबद्दल बोलण्यात आम्हाला फारसा रस नाही. हा वेळेचा दुरुपयोग वाटतो. मला त्यांच्याशी वाद घालायला देखील आवडत नाही. आपल्या देशात राजकारण्यांचा सर्वाधिक वेळ कुठे जात असेल तर तो एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात आणि टीकाटिप्पणी करण्यात जातो. मला त्यात पडायचं नाही. कारण माझ्या मनात कोणाबद्दलही चिड नसल्याचं त्यांनी सांगितलं.
21 जून 2022 रोजी एक मोठी बातमी समोर आली आणि महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथविधीनंतरची ही सगळ्यात मोठी राजकीय अविश्वसनीय बातमी होती. पण पुढे याच बातमीने महाराष्ट्राचं राजकारण कायमचं बदललं. शिवसेने ऐतिहासिक राजकीय बंड झालं होतं. तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारमधील काही मंत्री आणि आमदार नॉट रिचेबल असल्याची बातमी येऊन धडकली होती. तोपर्यंत उद्धव ठाकरे यांचे सहकारी आणि सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे यांनी 16 आमदारांसह सुरत गाठली होती. ही संख्या नंतर 40 आमदारांवर पोहोचली आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत उभी फूट पडली होती. त्यानंतर शिंदेंसोबत गेलेले आमदार परत उद्धव ठाकरेंसोबत येतील का? याची चर्चा होत असते, त्यावर आदित्य ठाकरे यांनी आज भाष्य केलं.