Samarjit Ghatge: समरजीत घाटगेंसाठी कोल्हापूरकर मैदानात; ‘या’ संघटनांनी दिला जाहीर पाठिंबा
मंत्रीपदाच्या लालसेपोटी हा माणूस मागच्या दाराने कधी पळाला हे कळालेच नाही.उद्धव साहेबांसह शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याला फसवणाऱ्या गद्दाराला कागलची जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.
मुरगूड : छत्रपती शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वंशज व सीएसारखे उच्चशिक्षित असलेल्या समरजितसिंह घाटगे यांच्यावर पालकमंत्री हसन मुश्रीफ खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत.यापुढे जाऊन राजघराण्यातील महिलांवरही ते अपशब्द वापरत आहेत.त्यांची अशी मस्तीची भाषा कागलकर कदापिही सहन करणार नाहीत.असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व उपनेते संजय पवार यांनी दिला. बामणी(ता.कागल)येथे महाविकास आघाडीचे उमेदवार राजे समरजितसिंह घाटगे यांच्या प्रचारार्थ झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप), लाल बावटा बांधकाम कामगार संघटना, सिटु सलग सर्व संघटना, किसान सभा या राज्यस्तरीय संघटनांचा घाटगे यांच्या उमेदवारीला पाठिंबा जाहीर केला.
पवार पुढे म्हणाले,कोल्हापूरकरांवर अनंत उपकार असलेले शाहू महाराज जर कागलच्या घाटगे घराण्यात जन्मले नसते तर ही देणगी कोल्हापूर संस्थानला मिळाली नसती.त्यांचे नातू स्व.विक्रमसिंहराजे घाटगे यांच्या बोटाला धरून मुश्रीफ राजकारणात आले. समरजितराजे यांच्यावर पातळी सोडून टीका करताना हसन मुश्रीफांनी याची तरी जाणीव ठेवावी.शाहू महाराजांच्या वंशजास निवडून देऊन त्यांच्या रुणातून उतराई होऊया.
शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे म्हणाले,पालकमंत्र्यांच्या घरावर ईडीची धाड पडल्यानंतर उद्धव ठाकरे साहेबांच्या आदेशानुसार त्यांना घरात जाऊन आम्ही ठामपणे पाठीशी असल्याचे सांगितले.मात्र मंत्रीपदाच्या लालसेपोटी हा माणूस मागच्या दाराने कधी पळाला हे कळालेच नाही.उद्धव साहेबांसह शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याला फसवणाऱ्या गद्दाराला कागलची जनता या निवडणुकीत धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.
राजे बँकेचे अध्यक्ष एम .पी. पाटील म्हणाले,समरजितसिंह घाटगे यांनी मंजूर करून आणलेल्या कामाचे श्रेय पालकमंत्री घेत आहेत.यापुढे जाऊन राजेंनी मंजूर करून आणलेला निधीही आपणच मंजूर करून आणल्याचे सांगितले आहे. त्यामुळे अशा प्रवृत्तीला आता हद्दपार करण्याची वेळ आली आहे. लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेचे राज्य सचिव शिवाजी मगदूम म्हणाले, गतवेळी आम्ही पालकमंत्र्यांना पाठिंबा दिला मात्र त्यांनी बांधकाम कामगारांना फसविले. या फसवणुकीचे त्यांना अद्दल घडविण्यासाठी चाळीस हजार बांधकाम कामगार व त्यांचे कुटुंबीय आघाडीवर असतील.