पुणे पोर्शे अपघात प्रकरणावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधीमंडळात स्पष्टीकरण
मुंबई : राज्याचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस असून लक्षवेधीमध्ये पुणे पोर्शे अपघात प्रकरण व ड्रग्ज प्रकरणाचा मुद्दा गाजला आहे. पुणे शहरामध्ये दिवसेंदिवस ड्रग्ज व व्यसनांचे प्रमाण वाढले आहे. अनेक प्रकरण समोर आली असून यावर विधीमंडळामध्ये लक्षवेधी वेळी चर्चा करण्यात आली. पुण्याचा उडता पंजाब होतोय असा गंभीर आरोप विरोधकांकडून करण्यात आला. तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विरोधकांनी पुण्यातील वाढत्या गुन्हेगारींवर घेरले आहे.
सुनील प्रभूंचा विधीमंडळामध्ये सवाल
ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी विधानसभेमध्ये पुणे पोर्शे अपघात प्रकरणाचा मुद्दा सभागृहमध्ये उपस्थित केला. आमदार प्रभू म्हणाले, वेदांत अग्रवाल या अल्पवयीन मुलाने व्यवसनांच्या नशेमध्ये दोघांचा बळी घेतला. या घटनेचे राज्यामध्ये व देशामध्ये पडसाद उमटले. वाहतूक पोलिसांसोबत काम व निंबधलेखन अशा स्वरुपाची एवढीच शिक्षा न्यायालयाने दिली. इतर रिक्षाचालक बसचालक व ट्रकचालकांकडून प्राणांतिक हानी झाली असेल तर 10 वर्षांची शिक्षा केली जाते. मात्र या प्रकरणामध्ये दोन जीव घेतल्यानंतर फक्त निबंध लिहायला लावणे ही संतापजनक बाब आहे. हा मुलगा पोलिसांच्या ताब्यात असताना श्रीमंताचा मुलगा म्हणून येरवडा पोलिसांनी सुरक्षा दिली. सॅन्डविच, बर्गर व बिर्याणी दिली गेली ही अत्यंत दुर्देवी बाब आहे. सरकार म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण उपाययोजना म्हणून काय करणार आहोत, असा सवाल आमदार प्रभू यांनी विधीमंडळामध्ये उपस्थित केला.
फडणवीसांनी सांगितला प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले. फडणवीस म्हणाले, हा विधीसंघर्षित मुलगा असून त्याला लोकांनी मारहाण केल्यानंतर पोलीस स्टेशनमध्य आणण्यात आलं. हे खरं आहे की पहिल्यांदा पोलिसांनी जो गुन्हा दाखल केला तो 304 अ असा होता. मात्र नंतर वरिष्ठांनी सांगितल्यानंतर 304 चा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचदिवशी 304 गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी अर्ज करुन आरोपीला प्रौढ म्हणून कारवाई करण्याची विनंती केली होती. कोर्टाच्या निर्णयानंतर पोलिसांनी लगेच अपील दाखल केली. पोलिसांनी रिव्हूयचा अधिकार वापरुन पीटीशन दाखल करण्यात आली. त्यानंतर जुना निर्णय न्यायालयाने बदलला आणि त्याला बाल सुधार गृहाची शिक्षा दिली. रक्ताचे रिपोर्ट चुकीचे असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यावर देखील पोलिसांनी डीएनए रिपोर्ट घेत रक्ताचे नमुने बदलल्याचे सांगितले. पोलिसांनी रक्त बदलल्याच्या संदर्भात देखील तातडीने कारवाई केली. संबंधीतांना अटक करत पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी सर्व टेक्निकल व लीगल पुरावे शोधून काढले आहेत, सर्व सीसीटीव्ही फुटेड व बारचे बील जप्त करण्यात आले आहेत. अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळामध्ये दिली.
पोलिसांकडून ‘या’ चुका झाल्या आहेत
पुढे देवेंद्र फडणवीस यांनी पोलीसांच्या कारवाईतील त्रुटींवर देखील भाष्य केले. फडणवीस म्हणाले, या प्रकरणामध्ये पोलिसांची पहिली चूक आहे की त्याला रात्री 3 वाजता आणलं तेव्हा लगेच मेडिकल टेस्टला पाठवायला हवं होतं. दुसरी चूक म्हणजे अशा प्रकारचा गुन्हा झाल्यानंतर त्यांनी वरिष्ठांना कळवायलं हवं होतं. पण वरिष्ठांना ते कळवलेलं नाही. वरिष्ठ आल्यानंतर 304 अ चा 304 करण्यात आलेला आहे. य चूकांच्या आधारावर आपली ड्युटी नीट केली नाही म्हणून त्यांना निलंबित केले आहे, अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोर्शे अपघात प्रकरणाबाबत दिली.