फोटो सौजन्य: iStock
खरीप २०२३ हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी खातेदारांनी ई-केवायसी करणे आवश्यक आहे, ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी केले नाही त्यांनी नजिकच्या कृषी कार्यालयांशी संपर्क करून ई-केवायसी करावे असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
राज्यातील सन 2023 च्या खरीप हंगामातील ई-पिक पहाणी पोर्टलवरील नोंदणीकृत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रु. 1000 तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रती हेक्टर रु.5000 (२ हेक्टरच्या मर्यादेत) अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावर कापूस सोयाबीन ची नोंद आहे, वनपट्टा धारक शेतकरी, ज्या गावातील भूमी अभिलेख संगणकीकरण झाले नाही, अशा गावातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी यांना हा लाभ देण्यात येणार आहे.
हे अर्थसहाय्य खातेदारांच्या आधार संलग्न बॅंक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे. यासाठी सर्वसाधारण 96 लाख खातेदारांपैकी 68 लाख खातेदारांनी आपले आधार संमती दिली आहे. या पैकी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत 46.68 लाख आधार क्रमांक जुळले आहेत. यांचे ई-केवायसी करण्याची आवश्यकता नाही. मात्र या व्यतिरिक्त 21.38 लाख खातेदार यांनी त्यांचे आधार ई-केवायसी करणे आवश्यक आहे. यापैकी 2.30 लाख खातेदार यांनी 25 सप्टेंबर 2024 अखेर ई-केवायसी पूर्ण केले आहे. याव्यतिरिक्त शिल्लक 19 लाख खातेदार यांचे करिता https://scagridbt.mahait.org/ या पोर्टलवर खालीलप्रमाणे सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे.
ज्या शेतकऱ्यांचे ई-केवायसी करावयाचे आहे, त्यांची यादी गावात प्रदर्शित करण्यात आलेली आहे. या शेतकऱ्यांनी संबंधित कृषि सहाय्यकाशी संपर्क साधावा. कृषि सहाय्यक त्यांचे लॉगीन मध्ये उपलब्ध सुविधेद्वारे संबंधित खातेदाराच्या आधार संलग्न मोबाईल क्रमांकावर येणाऱ्या ओटीपीच्या माध्यमातून ई-केवायसी करतील. तसेच शेतकरी स्वतः सुद्धा या पोर्टलवर जाऊन ओटीपीच्या माध्यमातून किंवा बायोमॅट्रीकच्या माध्यमातून सेवा सुविधा केंद्रात सीएसी (CSC) जाऊन सुद्धा ई-केवायसी करु शकतात.