मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार बंडखोरी केल्यानंतर पहिल्यांदाच शरद पवार यांचे निवासस्थान सिल्व्हर ओकला दाखल झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या काकी प्रतिभा पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकला दाखल झाल्याची माहिती आहे. यावेळी अजित पवार यांनी शरद पवार आणि प्रतिभा पवार यांच्या तब्बेची विचारपूस केली.प्रतिभा पवार यांच्यावर आजच ब्रीज काँडी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
प्रतिभा पवार यांच्या हातावर शस्त्रक्रिया
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर येथे शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया त्यांच्या हाताशी संबंधित होती. राष्ट्रवादी काँग्रेसने एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली होती.
प्रतिभा पवार राजकारणात नसून 2019 साली अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकार स्थापन केले तेव्हा त्यांना परत आणण्यात प्रतिभा पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. याचा उल्लेख शरद पवार यांनी त्यांच्या आत्मचरित्रात केला होता. त्यांनी आपल्या आत्मचरित्रात प्रतिभा पवार आणि अजित पवार यांच्यात अतुट नातं असल्याचे लिहिले आहे.
पवार त्यांच्या पुस्तकात लिहितात, “अजितचा भाऊ श्रीनिवास यांना त्यांच्याशी संवाद साधण्यास सांगण्यात आले होते. माझी पत्नी प्रतिभा आणि अजित यांचे घट्ट नाते आहे. प्रतिभा कधीच राजकीय घडामोडींमध्ये सहभागी होत नाही. पण अजितचे प्रकरण कुटुंबाशी निघडीत होते.” मात्र, यावेळी अजित पवार आपल्या आमदारांसह शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये सामील झाले. राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. अजित पवार गटानेही त्यांना राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष घोषित केले आहे