महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची महत्त्वाची घोषणा (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दारू दुकानांच्या परवान्याबाबत मोठी घोषणा केली आहे. त्यांनी रविवारी (१४ जुलै) सांगितले की, सरकारने एक नियम बनवला आहे आणि तो म्हणजे विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय दारू दुकानांचे परवाने दिले जाणार नाहीत.
यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दावा केला होता की, भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेतृत्वाखालील महायुती सरकार ‘आर्थिक संकटाला’ तोंड देण्यासाठी ३२८ नवीन दारू दुकानांचे परवाने देण्याची योजना आखत आहे. शरद पवार गटाचे नेते म्हणाले होते की यामुळे संतांची भूमी दारू पिण्याकडे खेचली जाईल आणि लाखो कुटुंबांना त्रास होईल.
‘महाराष्ट्रात नियमांचे पूर्णपणे पालन केले जाईल’ – अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, दारू परवान्यांचा प्रश्न आहे, तर महाराष्ट्रात नियमांचे पूर्णपणे पालन केले जाते. ते म्हणाले, “आम्ही असा नियम बनवला आहे की जर राज्यात दारू दुकानांचे परवाने द्यायचे असतील तर ते विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय करू नये.” यामुळे आता ज्यांना दारूचे दुकान काढायचे आहे आणि परवाना मिळवायचा आहे त्यांना विधिमंडळाला याबाबत पहिले सूचना द्यावी लागणार आहे. तसंच दारूच्या दुकानासाठी परवाना मिळवणं आता तितकं सोपं राहणार नाही.
गुजरात हे ड्राय स्टेट आहे मात्र महाराष्ट्रात भरपूर प्रमाणात दारू मिळते आणि अनेक ठिकाणी छापे मारून आजही दारूच्या भट्ट्यांना बंदी घातली जात आहे. गैरपणाने अनेक ठिकाणी दारूच्या भट्ट्या चालू असलेल्या दिसून येतात. या सर्वाला आळा घालण्यासाठी हे एक मोठे पाऊल असल्याचे आता बोलले जात आहे.
‘महिलांच्या आक्षेपावरून दुकाने बंद’
इतकेच नाही तर अजित पवार म्हणाले की, इतर राज्यांमध्ये दारू दुकानांच्या परवान्यांची संख्या वाढत आहे, परंतु महाराष्ट्र या बाबतीत नियम आणि कायदे पाळतो. आमची भूमिका वेगळी आहे. जर दुकान हलवावे लागले तर आम्ही नियमांनुसार परवानगी देतो आणि त्यानुसार सर्व काही घडते. असा प्रत्येक निर्णय घेणारी एक समिती आहे. जर महिलांनी कुठेतरी आक्षेप घेतला तर आम्ही दारू दुकाने बंद करतो.”
शरद पवार गटाचा दावा
दारू दुकानांशी संबंधित आरोप खरे आढळल्यास सरकार कारवाई करेल असे अजित पवार म्हणाले आहेत. तर यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (सपा) नेते जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत सडेतोड भूमिका घेतली होती आणि तरूणाई दारूकडे अधिक आकर्षित होत असून संतांच्या या भूमीला दारूकडे घेऊन जात आहे आणि यामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतील असंही त्यांनी म्हटलं होतं. मात्र यावर अजित पवारांनी सदर घोषणा करत पूर्णविराम लावला आहे.
लाडकी बहीण योजनेसाठी निधीचे दावे
अजित पवार यांनी असा दावा केला की भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार ‘लाडकी बहीण योजना (ज्याअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये मदत मिळते)’ सारख्या योजनांचा आर्थिक भार पेलण्यासाठी राज्यभरात ३२८ नवीन दारू दुकानांना परवाने देण्याची योजना आखत आहे. मात्र हे सर्व नियमांप्रमाणेच होईल याची त्यांनी घोषणा केली आहे आणि खात्री दिली आहे.