
अकोल्यात विनापरवानगी बोरवेल खोदकामाचा धडाका सुरुच; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली
उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने निर्बंध लागू केले आहेत. मात्र, शहरातील महापालिकेच्या चारही झोनमध्ये कोणतीही पूर्वपरवानगी न घेता सर्रास बोअरवेल खोदल्या जात आहेत. विशेष म्हणजे, काही ठिकाणी एकाच भूखंडावर एकाच दिवशी दोन-दोन बोअरवेल खोदल्या जात असल्याचे दिसून येत आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर तसेच भरवस्तीत बोअरिंगची अवजड वाहने उभी करून हे प्रकार खुलेआम सुरू आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर नियमांचे उल्लंघन होत असतानाही जिल्हा प्रशासन, महसूल यंत्रणा आणि महापालिकेचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी बोअरवेल खोदकामासंदर्भात निर्बंध लागू केल्यापासून महापालिका हद्दीत एकाही विनापरवाना बोअरवेलवर कारवाई झालेली नसल्याची बाबही समोर आली आहे. प्रशासनाच्या या बोअरवेल उदासीन भूमिकेमुळे व्यावसायिक आणि व्यावसायिकांचे चांगलेच फावले आहे.
भूजल पातळी खालावण्याचा धोका
अनिर्बंध बोअरवेल खोदकाम आणि भूजल उपशामुळे शहरातील भूजल पातळी झपाट्याने खालावण्याची भीती व्यक्त होत आहे. भविष्यात पिण्याच्या पाण्याचे स्रोत आटल्यास नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने केवळ कागदोपत्री आदेश काढण्याऐवजी प्रत्यक्ष कारवाई करणे गरजेचे आहे. विनापरवानगी बोअरवेल खोदणाऱ्यांसह संबंधित यंत्रमालकांवरही कठोर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
शहरात बोअरवेल खोदकामावर निर्बंध
शहरात बोअरवेल खोदकामावर निर्बंध असून, त्यासाठी जिल्हा प्रशासनाची ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) घेणे बंधनकारक आहे. असे प्रकार सुरू असल्यास त्याची माहिती घेऊन संबंधित पथकाला आवश्यक सूचना दिल्या जातील.
– शरद जावळे, उपविभागीय अधिकारी, अकोला
प्रश्न १ : अकोल्यात बोअरवेल खोदण्यासाठी काय नियम आहे?
उत्तर : बोअरवेल (विंधन विहीर) खोदण्यापूर्वी उपविभागीय अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे.
प्रश्न २ : विनापरवानगी बोअरवेल कुठे खोदल्या जात आहेत?
उत्तर : अकोला शहरातील महापालिकेच्या चारही झोनमध्ये विनापरवानगी बोअरवेल खोदल्या जात असल्याचे समोर आले आहे.
प्रश्न ३ : काही ठिकाणी किती बोअरवेल खोदल्या जात आहेत?
उत्तर : काही ठिकाणी एकाच भूखंडावर एकाच दिवशी दोन-दोन बोअरवेल खोदल्या जात असल्याचे दिसून येत आहे.