म्हसवड : अयोध्येमध्ये येत्या 22 तारखेला प्रभू श्री रामांची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. यासाठी देशभरामध्ये उत्साहाचे वातावरण असून शहराशहरामध्ये सोहळा साजरा केला जाणार आहे. म्हसवड गावामध्ये देखील या शूभमुहूर्तावर खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर म्हसवड येथील घराघरांमध्ये अयोध्येतून आणलेले अक्षता वाटप करण्यात आले.
म्हसवड शहरांतील या अक्षता वाटप उपक्रमासाठी प्रत्येक हिंदु महिलांनी व पुरुषांनी प्रत्येक हिंदु बांधवांच्या घरोघरी जाऊन वाटप केले आहे. जवळपास शहर व परिसरातील छोट्या मोठ्या गावातील तब्बल 20 ते 25 हजार नागरिकांना या अक्षतांचे वाटप करण्यात आले. अजुनही अक्षता वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे. येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्या येथे प्रभू श्री रामांची प्रतिष्ठापना होणार आहे. यासाठी श्री रामांच्या चरणी अर्पण करण्यात येणाऱ्या अक्षतांचे २७ डिसेंबर रोजी ऐतिहासिक म्हसवड शहरात आगमन झाले होते. त्यानंतर हा उपक्रम राबवण्यात आला.
पवित्र अक्षता वाटप उपक्रमामध्ये शहरातील प्रत्येक हिंदु बांधवापर्यंत वाटप व्हावे यासाठी संपुर्ण हिंदु बांधवांच्या वतीने नियोजनयुक्त काम करण्यात आले. अक्षता वाटप कार्यक्रमात शहरातील 100 ते 150 महिलांनी सहभाग घेतला. या महिलांनी शहरांतील प्रत्येक हिंदु बांधवांच्या घरापर्यंत जाऊन त्या घरातील महिलेला हळदी-कुंकु लावून अक्षता दिल्या. तसेच अक्षता २२ जानेवारी रोजी आपल्या घरातील मुर्तीवर टाकण्याबरोबरच त्या दिवशी घरासमोर मोठी रांगोळी काढुन तसेच सायंकाळी आपल्या घरासमोर दिवे लावावे असे सांगितले. या उपक्रमामुळे शहरातील व परिसरातील सर्व भागात अयोध्या येथुन आलेल्या या पवित्र अक्षतांचे वाटप करण्यात आले.
22 तारखेला खास कार्यक्रमाचे आयोजन
अयोध्येमध्ये येत्या २२ जानेवारी रोजी प्रभू श्रीरामाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या दिवशी दिवाळी साजरी करावी असे आवाहन पंतप्रधानांनी केले. हा दिवस सर्व हिंदु समाजासाठी एक उत्सव असुन हा दिवस सर्वांसाठी आनंद देणारा ठरावा यासाठी यादिवशी म्हसवड शहरात देखील दिवाळी सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी घरोघरी दिवाळी सणाप्रमाणेच दिवे लावुन फटाके फोडुन घरोघरी गोड पदार्थ करावेत असे आवाहन रामभक्तांनी केले. या दिवशी म्हसवड शहरातील श्रीराम मंदिरात भव्य अशा धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, तर ठिकठिकाणी मोठ्या अन्नदानाचेही नियोजन करण्यात आले आहे.