
तासगावमध्ये शक्तिसंघर्ष तीव्र, सर्वच पक्षांमध्ये नाट्यमय घडामोडी; नेमकं काय घडतंय?
शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी उसळली. नगराध्यक्ष पदासाठी १३ आणि नगरसेवक पदासाठी तब्बल १९० अर्ज दाखल झाल्याने आगामी निवडणूक चुरशीची आणि अनिश्चिततेने वेढलेली होणार हे स्पष्ट झाले. भाजपने नगराध्यक्षासह सर्व २५ जागांवर उमेदवार उभे केले असून, स्थानिक नेते स्वप्नील पाटील यांनी राष्ट्रवादी (अजित पवार गट) सोबत युतीसंदर्भातील चर्चा सुरू असल्याचे सांगितले. त्यामुळे महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला आकार घेत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी (शरद पवार गट) मध्ये उमेदवारी वाटपावरून तीव्र नाराजी उसळली आहे. स्व. आर.आर. पाटील यांचे तीन दशकांपासून कट्टर कार्यकर्ते असलेले माजी नगराध्यक्ष अजय पाटील संतप्त होत थेट राष्ट्रवादी (अजित पवार गट) मध्ये दाखल झाले. “आमदार रोहित पाटील यांना पैसेवाला उमेदवार हवा होता, आमच्या पत्नीची उमेदवारी अन्यायाने डावलण्यात आली,” अशी टीका करत त्यांनी शरद पवार गटाला चोख उत्तर दिले. त्यांच्या प्रवेशानंतर राष्ट्रवादीतील दुभंग आणखी गडद झाल्याचे स्पष्ट झाले.
अजय पाटील यांच्या पत्नी जोती पाटील यांनी अजित पवार गटाकडून थेट नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरला असून, त्यामुळे स्थानिक राजकारणाची समीकरणे पूर्णतः पालटली आहेत. याच घडामोडींमध्ये महत्त्वाची भर म्हणजे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांची भूमिका. त्यांनी आपल्या पत्नीचा अपक्ष अर्ज दाखल केला असला तरी, माजी खासदारांबाबतची नाराजी कायम असल्याने ते स्वतःचा उमेदवारी अर्ज माघारी घेत अजय पाटील यांच्या पत्नी ज्योती पाटील यांच्या पाठीशी उभे राहण्याची शक्यता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेत आहे.
अजय पाटील आणि महादेव पाटील यांच्यात समन्वय साधण्याचे प्रयत्न काही जणांकडून सुरू असून, अर्ज माघारीपर्यंत या मुद्द्यावर ठोस निर्णय होऊ शकतो, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. अशा हालचालींमुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ज्योती पाटील यांची ताकद वाढणार असल्याचे बोलले जात आहेत. यामुळे, माजी खासदार संजय पाटील आणि आमदार रोहित पाटील यांच्यासाठी ही परिस्थिती नव्या अडचणी निर्माण करणार का? याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
एकूणच तासगाव नगरपरिषद निवडणूक सध्या नाट्यमय वळणावर असून, दररोज बदलणारी समीकरणे, युतीची चर्चा, नाराजी, पक्षांतरे आणि संभाव्य नवीन शक्ति संतुलनामुळे मतदारांमध्ये उत्सुकता व गोंधळ शिगेला पोहोचला आहे. मतदानाच्या दिवशी नेमके कोणते समीकरण आकार घेते, याची उत्सुकता राज्यभरात निर्माण झाली आहे.
अमोल शिंदेंची दुहेरी चाल
“नगराध्यक्षपदाची उमेदवारी न मिळताच अमोल शिंदेंचा रोष उसळला आहे. स्वतःसाठी अधिकृत उमेदवारी आणि पत्नीचा अपक्ष अर्ज या दुहेरी रणनितीमुळे तासगावच्या राजकारणात नवा पेच निर्माण झाला आहे. या नाराजीची गाठ आमदार रोहित पाटील सोडवतात की अडकवतात, हेच आता शहरभरातील चर्चेचं केंद्रबिंदू ठरलं आहे.”
“तासगावच्या राजकारणात महायुतीचा अंतिम चेहरा कोण ठरवणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. भाजपच्या अधिकृत उमेदवार विद्या चव्हाण जोरदार प्रचारात असून, शेवटच्या क्षणी अजित पवार गटात प्रवेश केलेल्या ज्योती अजय पाटील यांनी संपूर्ण समीकरणाला नवीन वळण दिले आहे. वरिष्ठ पातळीवरील निर्णायक निर्णयाची प्रतीक्षा सुरू असून, शहराचे राजकीय तापमान ताणलेल्या टोकावर पोहोचले आहे.”