
तासगाव नगरपरिषद निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष; पारंपारिक विरोधकांचे मनोमिलन फक्त चर्चेपुरतेच?
तासगाव/ मिलिंद पोळ : तासगाव नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी अधिकृतपणे सुरू झाली असली तरी शहरातील राजकीय वातावरण मात्र अद्याप शांत आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया 10 नोव्हेंबरपासून सुरू झाल्यापासून पहिल्या चार दिवसांत एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही, हेच या निवडणुकीतील पहिले मोठे राजकीय कोडे ठरले आहे. वरवरची ही शांतता प्रत्यक्षात वादळापूर्वीची शांतता असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे.
गेल्या काही दिवसांत तासगावमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे माजी खासदार संजय पाटील व विद्यमान आमदार रोहित पाटील या दोन्ही पारंपारिक विरोधक गटांतील संभाव्य “समेट” होणार का, हा प्रश्न. सोशल मीडियावर या दोघांच्या एकत्रित लढतीच्या चर्चा चांगल्याच रंगल्या आहेत. मात्र प्रत्यक्षात दोन्ही नेत्यांनी आपापल्या पातळीवर स्वतंत्र राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे.
माजी खासदार संजय पाटील यांनी भाजपपासून फारकत घेतल्यानंतर विकासाभिमुख स्वतंत्र राजकीय प्रवास सुरू केल्याचे सांगितले आहे. तर विद्यमान आमदार रोहित पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या संमिश्र शक्तीच्या जोरावर निवडणूक लढवण्याची रणनीती आखली आहे.
दरम्यान, भारतीय जनता पक्षानेही तासगावमध्ये नव्याने संघटनात्मक बांधणी करत निवडणुकीला जोरदार तयारी सुरू केली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या तासगाव दौऱ्यानंतर भाजपने महायुतीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवण्याची दिशा स्पष्ट केली आहे. राजकीय समीकरण पाहता, तासगाव नगरपरिषदेत तिरंगी लढत होणार हे जवळपास निश्चित झालं आहे.
पारंपरिक विरोधक असणाऱ्या ‘आबा–काका’ गटातील समेटाच्या अफवा गेल्या काही महिन्यांपासून पसरवल्या जात आहेत. काही जणांच्या म्हणण्यानुसार या अफवांमागे काहींचा राजकीय स्वार्थ दडलेला आहे. कार्यकर्त्यांमध्ये मात्र या चर्चेमुळे संभ्रमाचे वातावरण आहे. दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांनी दीर्घकाळ एकमेकांविरोधात संघर्ष केलेला असल्याने, अचानक होणारे ‘मनोमिलन’ अनेकांसाठी अशक्यप्राय वाटत आहे.
या पार्श्वभूमीवर, उमेदवारांच्या वाढत्या आकांक्षा आणि प्रभागनिहाय ताणलेले समीकरण हे नेत्यांसमोर मोठे आव्हान बनले आहे. नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव असल्याने, महिला उमेदवारांमध्येही तयारीचा उत्साह दिसतो आहे. बारा प्रभागातून 24 नगरसेवक निवडून येणार असून प्रत्येक गटात उमेदवारीवरून गतीमान हालचाली सुरू आहेत.
अर्ज दाखल करण्याची मुदत संपेपर्यंत शांतता दिसली तरी 16 किंवा 17 नोव्हेंबरला मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होणार असल्याची चर्चा आहे. काही गटांनी उमेदवारी अर्ज ऑनलाइन भरण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. त्यामुळे “अंतिम क्षणी उमेदवारांची धावपळ” हे चित्र नक्कीच पाहायला मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, तासगाव नगरपरिषदेची ही निवडणूक केवळ सत्ता मिळविण्याची लढत न राहता, आगामी विधानसभा राजकारणाची झलक देणारी ठरणार आहे. पारंपारिक गटांतील मतभेद, नव्या राजकीय खेळी, महायुतीची नव्याने उभारणी आणि कार्यकर्त्यांमधील नाराजी या सगळ्यामुळे या निवडणुकीकडे जिल्ह्याचे नव्हे, तर राज्याचेही लक्ष लागले आहे. तासगावकर कोणाला कौल देतात आणि कोणाची राजकीय प्रतिष्ठा टिकवतात हेच आता पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. पण सध्या तरी तासगावची ही निवडणूक ‘शांततेच्या कवचाखाली दडलेले वादळ’ असल्याचं चित्र स्पष्ट दिसत आहे.