दीपक गायकवाड, मोखाडा: पालघर जिल्ह्यातील 102 रुग्णवाहिका सेवा ही ‘जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम’ अंतर्गत सुरू असलेली महत्त्वाची सार्वजनिक आरोग्य सेवा असून, गरोदर महिला, नवजात अर्भक आणि पाच वर्षांखालील मुलांसाठी ही सेवा मोफत उपलब्ध आहे. ही रुग्णवाहिका सेवा २४x७ कार्यरत असून, एका फोनवर गरजूंना वेळेवर वैद्यकीय मदत पोहोचवण्याचे काम करते. मात्र, या सेवेच्या गाभ्यात काम करणाऱ्या वाहनचालकांचे सध्या अतिशय हाल सुरू आहेत. डिसेंबर २०२४ पासून मार्च २०२५ पर्यंत, म्हणजे तब्बल चार महिन्यांपासून त्यांचे मानधन अदा करण्यात आलेले नाही. त्यामुळे अनेक चालक आणि त्यांच्या कुटुंबीयांना उपासमारीला सामोरे जावे लागत आहे.
या सेवा सुरुवातीला जिल्हा परिषदेकडून चालवल्या जात होत्या आणि वाहनचालकांना सुमारे १९,९९० रुपये मानधन मिळत होते. मात्र, ठेका प्रणाली लागू केल्यानंतर ‘विनसोल सोल्युशन प्रा. लि., पुणे’ या खासगी कंपनीला हे काम देण्यात आले. आता चालकांना दरमहा फक्त १६,००० रुपये मानधन दिले जाते, आणि सध्या तेही मिळालेलं नाही. यामुळे अनेकांचे संसार डळमळीत झाले असून, काहींना कर्ज काढून घरखर्च भागवावा लागत आहे. याशिवाय, शाळा-कॉलेजात शिकणाऱ्या मुलांचे शिक्षण अडथळ्यात आले आहे आणि काहींच्या कुटुंबातील सदस्य आजारी असूनही उपचारासाठी पैसे नाहीत, ही चिंतेची बाब आहे.
या सेवेसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व रुग्णवाहिकांमध्ये जीपीएस आणि आवश्यक वैद्यकीय उपकरणांची सुविधा असून, ती जीवनरक्षक ठरते. पण चालकांचे म्हणणे आहे की, आम्ही इतकी जबाबदारी पार पाडतो, तरीही आमच्यावर अन्याय होतो. भविष्य निर्वाह निधी (पीएफ) देखील गेल्या वर्षभरात जमा करण्यात आलेला नाही. ठेकेदार कंपनीकडून सांगण्यात येत आहे की, आरोग्य विभागाकडून अद्याप अनुदान प्राप्त झालेले नाही, त्यामुळे मानधन देऊ शकत नाही. या कारणामुळे वाहनचालकांचे आर्थिक आयुष्य संकटात आले आहे.
शेवटी, वाहनचालकांनी इशारा दिला आहे की, जर लवकरच मानधन आणि पीएफच्या प्रश्नावर तोडगा निघाला नाही, तर ते काम बंद आंदोलन करणार आहेत. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात अत्यावश्यक रुग्णसेवा ठप्प होण्याचा धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे.