
जादा भाडे आकारणाऱ्या ३५ ट्रॅव्हल्सला दंड! अमरावती-पुणे प्रवासासाठी ४ हजार भाडे; आरटीओ अधिकाऱ्यांना धरले धारेवर
Amravati News: दिवाळीच्या सुट्या संपताच पुणे आणि मुंबईकडे परतणाऱ्या विद्यार्थी व नोकरदारांची गर्दी वाढली असून, याच संधीचा गैरफायदा घेत खाजगी ट्रॅव्हल्सचालकांनी प्रवाशांची अक्षरशः लूट सुरू केली आहे. अमरावती-पुणे मार्गावर नेहमी १ हजार ते १ हजार ५०० रुपये असणारे तिकीट थेट २ हजार ते ४ हजार ५०० रुपयांपर्यंत आकारले जात आहे. या मनमानी भाडेवाढीविरोधात विदर्भ ऑटो युनियनचे अध्यक्ष नितीन मोहड यांनी वेलकम पॉईंटवर आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केले. त्यांच्या आंदोलनानंतर प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी करण्यात आलेल्या तपासणीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३५ खाजगी ट्रॅव्हल्सवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली.(फोटो सौजन्य – AI)
NCMC स्मार्ट कार्ड अन् ई-बसमुळे एसटीच्या उत्पन्नाला ब्रेक; अमरावती विभागाला १.८८ कोटींचा फटका
दिवाळीच्या सुट्या संपवून शिक्षण आणि नोकरीनिमित्त पुणे, मुंबईकडे परतणाऱ्या तरुणांची सध्या मोठी गर्दी आहे. याचा फायदा घेत खाजगी बसचालकांनी तिकिटांचे दर दुप्पट ते तिप्पट केले आहेत. सामान्य दिवसांत १ हजार ते १ हजार ५०० रुपयांत होणारा अमरावती-पुणे प्रवास आता २ हजार ते ४ हजार ५०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. विदर्भातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांतील विद्यार्थी मोठ्या कष्टाने बाहेरगावी शिक्षणासाठी जातात.
खासगी प्रवासी वाहतुकीसंदर्भातील नियमांनुसार राज्य परिवहन महामंडळाच्या निर्धारित भाड्यापेक्षा दीडपट अधिक भाडे आकारण्यास मनाई असल्याचा मुद्दा आंदोलकांनी उपस्थित केला. तसेच खाजगी बसेसना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी थेट प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी असताना शहरात ठिकठिकाणी कार्यालये थाटून तिकीट विक्री केली जात असल्याचा आरोप करण्यात आला. प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांत क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूकही होत असल्याचे मोहड यांनी निदर्शनास आणून दिले.
प्रवाशांची आर्थिक लूट आणि नियमबाह्य मालवाहतूक रोखण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने २७ ऑक्टोबरपासून विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत क्षमतेपेक्षा अधिक सामानाची वाहतूक करणाऱ्या ८० बसेसवर प्रत्येकी १० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक भाडे आकारणाऱ्या ३५ खाजगी ट्रॅव्हल्सवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, विनापरवाना धावणाऱ्या १६० वाहनांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
या प्रकाराविरोधात विदर्भ ऑटो युनियनचे अध्यक्ष मोहड यांनी सहकाऱ्यांसह अमरावतीच्या वेलकम पॉईंटवर ठिय्या आंदोलन केले. आंदोलनाची माहिती मिळताच प्रादेशिक परिवहन अधिकारी दळवी आणि जाधव पथकासह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी आंदोलकांनी अधिकाऱ्यांसमक्ष पुण्याकडे जाणाऱ्या खाजगी बसेस थांबवून प्रवाशांच्या तिकिटांची तपासणी केली. त्यात एका ट्रॅव्हल्सच्या बसमधील प्रवासी राकेश शिवणकर यांच्याकडून तब्बल ३ हजार ६५० रुपये, तर गौरव यांच्यासह अन्य विद्यार्थ्यांकडून २ हजार ते २ हजार ५०० रुपये भाडे आकारल्याचे समोर आले. विशेष म्हणजे, संबंधित ट्रॅव्हल्सकडे प्रवाशांची अधिकृत यादी आणि दैनंदिन परवानाही नसल्याचे तपासणीत निदर्शनास आले. याप्रकरणी कुंदन ट्रॅव्हल्सला दंडात्मक नोटीस बजावण्यात आली.
Amravati News: भाववाढीच्या प्रतीक्षेत कापूस घरातच! सोयाबीनची आवकही घटली; ४ दिवसांत दरात झाली घसरण
प्रादेशिक परिवहन अधिकारी दळवी यांनी २७ ऑक्टोबरपासून आतापर्यंत ६०० वाहनांची तपासणी केल्याची माहिती दिली. नियमभंग करणाऱ्यांविरोधात पुढील १० दिवस विशेष तपासणी मोहीम सुरू राहणार असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर आंदोलकांनी तूर्तास आंदोलन स्थगित केले. मात्र, आगामी नाताळ आणि उन्हाळी सुट्टयांमध्येडी प्रवाशांची अशी आर्थिक लूट होऊ नये, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी कायम आहे.